जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोनासंदर्भात संवाद व प्रबोधन केंद्र कार्यान्वित ; प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात होणार मार्गदर्शन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 14 :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासनाएवढीच नागरिकांची भुमिका सुध्दा महत्वाची आहे. शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, या उद्देशाने नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने बचत भवन येथे संवाद व प्रबोधन कक्ष (कोरोना मदत कक्ष) कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या कक्षाचे नुकतेच उद्घाटन केले.
जिल्हाधिका-यांच्या सूचनेनुसार स्थानिक सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्यावतीने संचलित संवाद व प्रबोधन कक्ष सुरू करण्यात आला आहे. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, सदर कक्षामार्फत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार साथरोग नियम पाळणे, सार्वजनिक तसेच कौटुंबिक समारंभ आयोजकांशी थेट संपर्क करून कार्यक्रमातील गर्दी टाळण्याबाबत आवाहन केले जाणार आहे. घरातील कर्त्या पुरुषांना अशा प्रकारे केले जाणारे थेट आवाहन समारंभातील गर्दी टाळणारे ठरेल. तसेच या केंद्राद्वारे कोरोना संसर्ग प्रतिबंधक जाणीवजागृती आणि तशा प्रकारची घोषवाक्ये, लघु वृत्तपट, माहिती पट, संदेश चित्रे तयार करून सामाजिक माध्यमातून सार्वत्रिक केली जाणार आहे.
जिल्हा परिषदेची यंत्रणासुद्धा याकामी मदत केंद्राला सहकार्य करेल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले. मदत केंद्राचे समन्वयक प्रा. घन:श्याम दरणे यांनी उपस्थितांना मदत केंद्राच्या कामाचे प्रारूप स्पष्ट करताना सांगितले की, संवाद कौशल्यात निपून असणारे महाविद्यालयाचे विद्यार्थी हे केंद्र जबाबदारीने सांभाळतील आणि कोरोना संसर्गाच्या लढाईमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतील.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, प्राचार्य डॉ. अविनाश शिर्के, प्रा. डॉ. सीमा शेटे आणि मदत केंद्र सांभाळणारे महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
०००००००