जिल्हा बाल संरक्षण कक्षाने रोखला आणखी एक बालविवाह….
जिल्हा बाल संरक्षण कक्षाने रोखला आणखी एक बालविवाह….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 17 :- एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील विविध तालुक्यात मिळालेल्या माहितीच्या आधारे सहा बालविवाह रोखण्याची कारवाई नुकतीच झाली असताना पुन्हा एक बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षाला यश मिळाले आहे.
नेर तालुक्यातील मुकीनंदपुर बेडा येथील वय वर्ष 16 असलेल्या बालिकेचा बालविवाह होत असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांना नेरचे तहसीलदार अमोल पोवार यांनी दिली. या माहितीची तात्काळ दखल घेत मुलीच्या जन्म तारखेची व वयाची शहानिशा करण्यात आली. सदर बालिका अल्पवयीन आहे व तिचा 22 तारखेला विवाह नियोजित आहे असे समजले. त्या आधारे बाल विवाह रोखण्याची कार्यवाही जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ज्योती कडू व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. यावेळी बालिकेच्या कुटुंबाला तिचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाह न लावण्याबाबत समुपदेशन करण्यात आले तसेच लेखी हमीपत्र घेण्यात आले.
ही कार्यवाही जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे विधी तथा परिविक्षा अधिकारी महेश हळदे, गावचे ग्रामसेवक आर. निमकर, नेरचे पोलिस निरीक्षक श्री घुगे, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती पवार यांच्या उपस्थितीत पार पाडली. बालविवाह बाबत जनतेने सतर्क राहावे. काही माहिती असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष तथा 1098 या हेल्प लाईन क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांनी केले आहे.
०००००००