राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या नाथाभाऊंना शुभेच्छा – भाजपा
‘ नाथाभाऊंनी भाजपामध्ये रहावे , अशी आमची इच्छा होती ‘
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
एकनाथ खडसे यांनी भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ खडसे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात भाजपामधून झाली होती. कार्यकर्ते, सरपंच, नेते आणि मंत्री असा त्यांचा प्रवास आहे. एकनाथ खडसे सारख्या नेत्यांना पक्ष सोडणे, हा भाजपासाठी एक झटका आहे.
एकनाथ खडसे यांना पुढील राजकीय प्रवासासाठी भाजपाने शुभेच्छा दिल्या आहेत. “नाथाभाऊंनी भाजपामध्ये रहावे, अशी आमची इच्छा होती. नाथाभाऊ भाजपाचे नेते होते. नाथाभाऊ भाजपा सोडणार नाही अशी अपेक्षा होती. नाथाभाऊंनी भाजपा सोडू नये, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले” असे भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले.
“त्यांनी पक्षात रहावं, पक्षाचं नेतृत्व करावं, यासाठी संवादाची प्रक्रिया सुरु होती. पण त्यांचा निर्णय झाला असावा, चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु होता. कुठलाही साधा कार्यकर्ता सोडून जातो, तो चांगला प्रसंग नसतो. नाथाभाऊंनी पक्ष सोडू नये, यासाठी मनापासून प्रयत्न केले” असे केशन उपाध्ये यांनी सांगितले.
भाजपाचा राज्यामध्ये विस्तार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. राज्य सरकारमध्ये मंत्री, विरोधी पक्ष नेतेपद अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या होत्या.
२०१४ मध्ये राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. तेव्हापासूनच खडसे नाराज होते. मागच्या काही वर्षांपासून ते भाजपाच्या सक्रीय राजकारणातून बाजूला पडले होते. आपल्यावर अन्याय होत असल्याची त्यांची भावना होती. आपली नाराजी त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवली होती. अखेर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.