पंतप्रधानांच्या आवाहनाला उपमुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद! एकनाथ शिंदे आता वापरणार इलेक्ट्रिक कार; ताफ्यातही केली कपात
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :-
“वाढत्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी देशवासियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या वापरासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार केल्याची घोषणा बुधवारी ठाण्यात केली.
तसेच आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, देशहितासाठी इंधन बचत ही काळाची गरज बनली आहे. “सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या वाहनांचाच ताफ्यात समावेश ठेवण्यात आला असून इतर वाहनांची संख्या कमी करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मी स्वतः इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू केला आहे,” असे त्यांनी सांगितले.
रविवारी पंतप्रधान मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर शक्य तितका कमी करण्याचे तसेच पर्यायी ऊर्जेचा वापर वाढवण्याचे आवाहन देशवासियांना केले होते. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. मोदी यांनी नेहमीच राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कोविड काळातही त्यांनी केलेल्या आवाहनामुळे देशातील नागरिकांनी योग्य खबरदारी घेतली आणि भारताने मोठ्या संकटावर मात केली,” असे ते म्हणाले.
सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे ऊर्जा संसाधनांवर ताण निर्माण होत असल्याचे नमूद करत त्यांनी इंधन बचतीचे महत्त्व अधोरेखित केले. “आज जगभरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. अशा वेळी भविष्यातील गरजा लक्षात घेऊन इंधनाचा वापर संयमाने करणे गरजेचे आहे. देशाकडे पुरेशा प्रमाणात इंधनसाठा उपलब्ध राहावा, यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारली पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारमधील मंत्री आणि अधिकाऱ्यांनीही शक्य तितक्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा, यासाठी लवकरच सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. “पर्यावरण संरक्षणासोबतच इंधन बचतीसाठीही इलेक्ट्रिक वाहने हा चांगला पर्याय आहे. सरकारने या दिशेने पावले उचलण्याची गरज आहे,” असेही ते म्हणाले.
राजकीय टीकेबाबत बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “देशासमोर गंभीर आव्हाने उभी असताना काही जण राजकारण करण्यात व्यस्त आहेत. ही वेळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची नसून देशहितासाठी एकत्र येण्याची आहे,” असे त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही इंधन बचतीबाबत जनतेला आवाहन केल्याचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, “देशहिताच्या विषयावर सर्वांनी एकत्र उभे राहणे आवश्यक आहे. मात्र विरोधकांकडून पंतप्रधान मोदी यांच्यावर सातत्याने टीका केली जाते. देशातील जनतेला हे मान्य नसून १४० कोटी भारतीय मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.”
पश्चिम बंगाल आणि आसाममधील निवडणुकांचा दाखला देत त्यांनी विरोधकांवर टीका केली. “पंतप्रधानांवर टीका करणाऱ्यांना जनताच उत्तर देत आहे. काँग्रेसची आजची अवस्था सर्वांसमोर असून जनतेचा विश्वास कुणावर आहे, हे वारंवार स्पष्ट होत आहे,” असेही शिंदे यांनी सांगितले.

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….