शिक्षकांच्या 8 ते 13 हजार जागा भरणार, शिक्षणसेवकांच्या आशा पल्लवित….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यात ’पवित्र’ पोर्टलद्वारे किमान 13 हजार नव्या शिक्षकांची भरती होण्याची आनंदवार्ता असून, यामुळे पूर्ण पगारी शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षणसेवकांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.
अनेक महिन्यांपासून रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया आता वेग घेत असल्याचे शिक्षण खात्यातील सूत्रांचे म्हणणे आहे. शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना 31 मे 2026 पर्यंत त्यांच्या रिक्त पदांच्या जाहिराती ’पवित्र’ पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी, जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची हजारो रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा होत आहे. शिक्षण विभागाने केवळ सध्या रिक्त पदेच नव्हे, तर मे 2026 अखेरपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या संभाव्य जागांचाही समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
1 ते 31 मे या कालावधीत सर्व शाळांनी रिक्त पदांची माहिती पोर्टलवर नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर जूनमध्ये पात्र उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार शाळांचे पसंतीक्रम भरण्याची संधी मिळेल. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने पारदर्शकतेचा दावा केला जात आहे.
1.70 लाख उमेदवार प्रतीक्षेत
गेल्यावर्षी झालेल्या ’शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ला तब्बल 2 लाख 28 हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 11 हजार 308 उमेदवार परीक्षेला बसले, तर 1 लाख 70 हजार 108 उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली आहे. या सर्व पात्र उमेदवारांच्या नजरा आता भरतीकडे लागल्या आहेत.
’आधी समायोजन, मग भरती’ धोरणामुळे घटल्या जागा
उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्षात राज्यात 40 ते 45 हजार शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन होते. मात्र, 15 मार्च 2024 च्या संचमान्यता निकषांमधील बदलांमुळे राज्यभर तब्बल 30 हजार शिक्षक अतिरिक्त (सरप्लस) ठरवण्यात आले आहेत. या शिक्षकांचे आधी समायोजन आणि उरलेल्या जागांवरच नवी भरती, असा पवित्रा शिक्षण विभागाने घेतला. परिणामी, शिक्षक भरतीच्या जागा घटल्या. समायोजनातून उरलेल्या किमान 8 आणि जास्तीत जास्त 13 हजार शिक्षकांची भरती नव्या जागांवर केली जाईल. त्यातही विद्यमान शिक्षण सेवकांचा नंबर लावला गेला, तर शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या किती बेरोजगारांना शिक्षकाची नोकरी मिळेल, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे.
राज्यात सतराशे तलाठ्यांची भरती होणार ’एमपीएससी’मार्फत
राज्यात तब्बल 1,700 तलाठी पदांची भरती ’एमपीएससी’कडून होणार असून, यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाकडून मागणी पत्र मागवण्यात आले आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेला वेग येणार आहे. शासन निर्णयानुसार, जिल्हानिहाय रिक्त जागांचा अहवाल तयार करण्यात येत आहे.
मुलाखतीविना भरतीचा दावा
’पवित्र’ पोर्टलमार्फत भरती प्रक्रिया राबवून वशिलेबाजीला आळा घालण्याचा शासनाचा दावा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांची भरती पूर्णपणे गुणवत्तेनुसार आणि मुलाखतीशिवाय होणार आहे. मात्र, खासगी संस्थांना प्रत्येक जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्याची मुभा देण्यात आली आहे.

“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका….
दहावीचा निकाल या दिवशी लागणार ; संभाव्य तारीख आली समोर….
काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
शिक्षकांच्या 8 ते 13 हजार जागा भरणार, शिक्षणसेवकांच्या आशा पल्लवित….