“पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच”; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित कागदपत्रे गहाळ असल्याच्या चर्चांना केंद्र सरकारने पूर्णविराम दिला आहे. पंडित नेहरूंची कागदपत्रे गहाळ झालेली नाहीत, तर ती सोनिया गांधी यांच्या ताब्यात आहेत, असा स्पष्ट खुलासा सांस्कृतिक मंत्रालयाने केला आहे.
या मुद्द्यावरून आता भाजप आणि काँग्रेसमध्ये नवा राजकीय कलगीतुरा रंगला असून, सरकारने सोनिया गांधींना ही कागदपत्रे परत करण्याचे आवाहन केले आहे.
नेमका वाद काय?
काही दिवसांपूर्वी पंडित नेहरूंची महत्त्वाची कागदपत्रे प्राईम मिनिस्टर्स म्युझियम अँड लायब्ररीमधून गहाळ झाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. मात्र, संसदेत भाजप खासदार संबित पात्रा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सर्व दावे फेटाळून लावले. २०२५ च्या वार्षिक ऑडिटमध्ये एकही कागदपत्र गहाळ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
२००८ मध्ये कागदपत्रे परत नेली?
सांस्कृतिक मंत्रालयाने सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणाचा घटनाक्रम सांगितला आहे. २९ एप्रिल २००८ रोजी सोनिया गांधींचे प्रतिनिधी एम. व्ही. राजन यांनी एक पत्र लिहून नेहरूंशी संबंधित कौटुंबिक खाजगी पत्रे आणि नोट्स परत मागितल्या होत्या. या विनंतीनंतर तत्कालीन सरकारने नेहरूंच्या खाजगी कागदपत्रांचे तब्बल ५१ कार्टन्स सोनिया गांधींकडे सोपवले होते. ही कागदपत्रे परत करण्यासाठी पीएमएमएलकडून सोनिया गांधींच्या कार्यालयाला २८ जानेवारी २०२५ आणि ३ जुलै २०२५ रोजी स्मरणपत्रे पाठवण्यात आली आहेत, मात्र ती अद्याप परत मिळालेली नाहीत.
“तो देशाचा वारसा, खाजगी मालमत्ता नाही”
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सोनिया गांधींवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. “नेहरूंची कागदपत्रे हा भारताचा ऐतिहासिक वारसा आहे, ती कोणाचीही खाजगी मालमत्ता असू शकत नाही. सोनिया गांधी देशाला काय लपवत आहेत? ही कागदपत्रे सार्वजनिक संग्रहालयात असणे आवश्यक आहे जेणेकरून संशोधक आणि नागरिकांना ती पाहता येतील,” असे शेखावत म्हणाले.
दरम्यान, संसदेत कागदपत्रे गहाळ नसल्याचे उत्तर आल्यानंतर काँग्रेसने भाजपवर खोटेपणाचा आरोप करत माफीची मागणी केली होती. मात्र, सरकारने “कागदपत्रे गहाळ नाहीत कारण ती कोणाकडे आहेत हे आम्हाला माहित आहे,” असं म्हणत चेंडू पुन्हा काँग्रेसच्या कोर्टात टाकला आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….