शशी थरूर यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपचा ऐतिहासिक विजय; काँग्रेस खासदार म्हणाले, “हेच लोकशाहीचं सौंदर्य”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “केरळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल समोर आले असून, काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीने निर्णायक विजय मिळवत मोठी आघाडी घेतली आहे.
मात्र या निवडणुकीत राजधानी तिरुवनंतपुरम नगर निगम मध्ये भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ऐतिहासिक कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. या निकालावर काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युडीएफने नगरपालिकेच्या आणि ग्रामपंचायतींच्या स्तरावर सर्वात मोठी ताकद म्हणून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निकालांना २०२६ च्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी युडीएफसाठी मोठे समर्थन आणि सकारात्मक संकेत मानले जात आहे. सत्ताधारी डाव्या लोकशाही आघाडीला या निवडणुकीत जोरदार धक्का बसला असून, त्यांच्या अनेक महत्त्वाकांक्षी कल्याणकारी योजना मतदारांना आकर्षित करण्यात कमी पडल्याचे दिसून येते. युडीएफच्या या यशामागे सत्ताविरोधी लाट, कार्यकर्त्यांची मेहनत यांचा परिणाम असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
तिरुवनंतपुरममध्ये भाजपचा इतिहास
या निवडणुकीतील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक बदल तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत पाहायला मिळाला. भाजपने तिरुवनंतपुरममध्ये विजय मिळवून ४५ वर्षांपासून असलेले एलडीएफचे वर्चस्व संपुष्टात आणले आहे. तिरुवनंतपुरम महापालिकेच्या १०१ वॉर्डपैकी ५० जागांवर एनडीएने विजय मिळवला. काँग्रेसच्या तीव्र लढतीनंतरही पालक्कड नगरपालिका टिकवून ठेवली, तर काँग्रेसला त्रिप्पुनिथुरा नगरपालिकेत पराभव स्वीकारावा लागला. त्रिशूर लोकसभा मतदारसंघातही भाजपने चांगली कामगिरी केली आहे. त्रिशूर निगममध्ये ८ वॉर्ड, कोडुंगल्लूर नगरपालिकेत १८, तसेच इतर नगरपालिका आणि ग्रामपंचायतींमध्येही पक्षाने लक्षणीय जागा जिंकल्या आहेत.
खासदार शशि थरूर यांची प्रतिक्रिया
तिरुवनंतपुरमचे खासदार तथा काँग्रेस नेते शशि थरूर यांनी निकालांवर प्रतिक्रिया देताना ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. त्यांनी यूडीफच्या प्रभावी विजयाबद्दल अभिनंदन केले आणि या विजयाला राज्य विधानसभेसाठी मिळालेला शक्तिशाली संकेत म्हटले.
थरूर यांनी त्यांच्याच मतदारसंघातील तिरुवनंतपुरम महापालिकेत भाजपच्या ऐतिहासिक प्रदर्शनाचा स्वीकार करत, त्यांचे अभिनंदन केले. हे यश राजधानीच्या राजकीय वातावरणात झालेला उल्लेखनीय बदल दर्शवते. “४५ वर्षांच्या एलडीफच्या कुशासनातून बदलासाठी त्यांनी प्रचार केला होता, परंतु मतदारांनी अखेरीस ‘शासनात स्पष्ट बदल’ मागणाऱ्या दुसऱ्या पक्षाला (भाजप) निवडले आहे आणि’हीच लोकशाहीची सुंदरता आहे,” असं शशी थरुर म्हणाले.
नवीन राजकीय समीकरणे
या निकालांमुळे केरळच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होत असल्याचे संकेत मिळत आहेत. तिरुवनंतपुरममध्ये एनडीएने मोठी सत्ता मिळवली असली तरी, पंढळम नगरपालिकेमध्ये मात्र त्यांना मोठा धक्का बसला आहे. २०२० मध्ये एनडीएने जिंकलेल्या या महत्त्वाच्या नगरपालिकेत ते यंदा ३४ पैकी केवळ ९ जागा जिंकू शकले. एकंदरीत, हे निकाल शहरी भागांत भाजपची वाढती ताकद आणि राज्याच्या राजकारणात युडीएफचे प्रभावी पुनरागमन दर्शवत आहेत.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….