…अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “निवडणुकीचे घाेडा मैदान आता जवळ आहे. त्यामुळे आगामी काळात ठिकऱ्या काेणाच्या उडतील, हे ठाण्यातली जनता दाखवून देईल, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात उद्धवसेनेसह राज ठाकरेंना दिला.
त्याशिवाय स्वत:च्या विचारांवर, भूमिकेवर जे ठाम राहत नाहीत, अशा लाेकांचा बॅंड जनता वाजवत असते आणि ठाणेकर नक्की वाजवतील अशी बोचरी टीकाही शिंदे यांनी राज यांच्यावर केली. काेपरीतील दिवाळी निमित्तच्या एका कार्यक्रमात ते बाेलत हाेते.
आगामी निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकणार असल्याचा दावाही एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात केला. ठाण्यातील काेपरी भागातील अष्टविनायक चाैक येथे शनिवारी दिवाळी पूर्व संध्या या कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते. याच कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर टीका केली. शिंदे म्हणाले की, ठिकऱ्या काेणाच्या उडतील, हे येणाऱ्या निवडणुकीतच ठाण्यातली जनता दाखवून देईल. आनंद दिघे यांचा त्यांनी अपमान केला आहे. त्यांना कमी लेखले. बाळासाहेब ठाकरे हे आमच्या हृदयात आहेत आणि आनंद दिघे हे आमच्या रक्तात आहेत. ज्यांनी शिवसेना विकली, त्यांना जनता टिकली देईल अशी बाेचरी टीकाही उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी केली.
उद्धवसेनेला धक्का
मुंबईतील उद्धवसेनेचे माजी नगरसेवक सगुण नाईक, लालू वर्मा, शाखाप्रमुख अक्षय राऊत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रविवारी ठाण्यात शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी अहिल्यानगरचे प्रकाश चित्ते, प्रदेश सचिव रेश्मा जगताप तसेच देवळालीच्या पदाधिकाऱ्यांचेही शिंदे यांनी शिवसेनेत स्वागत केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत महायुतीचाच भगवा फडकणार असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.