पक्ष-निशाणी चोरली, आता मतदारही चोरले, यापुढे निवडणुका होतील की नाही याबाबत शंका : भास्कर जाधव…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “या आधी पक्ष चोरले, निशाणी चोरली, आमदार चोरले, नेते चोरले, एवढं सगळ्या झाल्यानंतर आता काय चोरायचं म्हणून मतदारही चोरले अशा शब्दात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी महायुतीला टोला लगावला.
राज्यात असे चोर ठेवायचे का नाही याचा विचार आता मतदारांनी करायची गरज असल्याचंही ते म्हणाले. तसेच यापुढे निवडणुका होतील की नाही अशी शंका भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.
भास्कर जाधव म्हणाले की, “सरकारबद्दल राज्यात प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे. सरकारने प्रत्येक टप्प्यावर सर्वच स्तरातल्या मतदारांना फसवून मतदान घेतलं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कितीही उशिरा झाल्या तरी त्याची सरकारला काळजी नव्हती. पण न्यायालयाने या निवडणुका घ्या असा आदेश दिला. आता मतदार जागरूक झाला आहे. त्यामुळे या निवडणुका सरकारला जड जाणार याची कल्पना असल्यामुळे निवडणुका होतील की नाही यावर शंका.”
राज ठाकरेंवर काय म्हणाले?
राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये आल्यामुळे त्याचा परिणाम आघाडीवर होईल का या प्रश्नावर उत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले की, “यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही आघाडी म्हणून कधीही लढलो नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीमध्ये येण्याच्या चर्चेमुळे आघाडीत मिठाचा खडा पडेल किंवा अन्य चर्चा या व्यर्थ आहेत. राज ठाकरे यांनी 2017 मध्ये काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. त्यावेळी स्वतःचा पक्ष असताना काँग्रेसचा प्रचार करायला राज ठाकरे चालले, तर आता का चालणार नाहीत?
शिंदे गटाचा स्वबळाचा नारा?
कोकण, पश्चिम महाराष्ट्रात काही भागात महायुतीत निवडणुका लढणं धूसर असल्याचा सूर शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत उमटलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीत असा सूर पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला.
युतीत निवडणुका न झाल्यास स्वतंत्र लढण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. त्याचसोबत शिक्षण, पदवीधर निवडणुकीसाठीही मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली. बुधवारी एकनाथ शिंदेंनी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र मंत्री, आमदारांची बैठक घेतली. पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.