राज्यात पुन्हा पावसाचा इशारा, १५ ऑक्टोबरपासून वादळी पाऊस येणार; हवामान खात्याची महत्त्वाची माहिती….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरड्या हवामानाने सुरुवात केली असतानाच, आता हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. १५ ऑक्टोबरपासून ते १८ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या काळात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि वादळी वारे येण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.
कोणत्या भागात किती धोका?
विदर्भ आणि मराठवाडा या दोन भागात वादळी पावसाची अधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि खानदेश या काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचा सल्ला –
काढणी केलेली धान्यं, कडधान्यं आणि फळपिकं सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचं सांगण्यात आलं आहे. शेतातील पीकं झाकण्यासाठी ताडपत्री, प्लास्टिकचा वापर करावा, असं सांगण्यात आलं आहे. पिकांना झाडांना आधार द्यावा, पिकांचं वाऱ्यापासून संरक्षण करावं, अशा सूचना हवामान खात्याने दिल्या आहेत. तसंच हवामान खात्याचे अपडेट्स नियमित तपासावेत आणि त्यानुसार पिकांची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हवामानात बदल का?
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात हा बदल होतो आहे. त्यामुळे नैऋत्य मान्सून संपला असला तरी पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
‘आता घोषणा नाही, तर कृतीची वेळ आहे’
हवामान विभाग आणि कृषी विभागाने पुन्हा एकदा पावसाची शक्यता दर्शवल्यामुळे, शेतकऱ्यांनी कुठलीही दिरंगाई न करता आपली पीक साठवण, संरक्षणाची उपाययोजना तात्काळ सुरू करावी, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे. दरम्यान, याआधी झालेल्या पावसाने विदर्भ, मराठवाड्यात मोठं नुकसान झालं आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात, नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतात पाणी साचून शेतात काढणीला आलेलं पीक खराब झालं आहे. आता पुन्हा पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं सांगण्यात आलं आहे.