अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले..?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी पुन्हा एकदा अतिशय वादग्रस्त विधान करून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापवले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘दिवाळीची खरेदी फक्त हिंदू दुकानदारांकडूनच करा’ असे विधान केले होते.
आता त्यांनी “हिंदू महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत सर्व आरोपी जिहादीच असतात” असे विधान केले आहे. त्यांच्या या नव्या विधानावरून राजकीय वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे एका आदिवासी महिलेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात बोलताना आमदार जगताप म्हणाले की, “अत्याचाराच्या शंभर घटनांमध्ये शंभर महिला हिंदू सापडतात आणि सर्व आरोपी जिहादी असतात. आपल्यातीलच काही मानसिक खतना झालेले लोक आरोपींना पाठीशी घालतात, जे हिरवे साप फणा काढतील त्यांना ठेचण्याची वेळ आली आहे”, असे संग्राम जगताप यांनी म्हटले आहे.
गुन्हेगारीच्या वाढीबद्दल बोलताना त्यांनी बेकरीचा संदर्भ दिला. महिलांना बेकरीतील पदार्थ देण्याच्या बहाण्याने त्यांचे मोबाईल नंबर घेतले जातात, यातूनच गुन्ह्यांची सुरुवात होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय, त्यांनी प्रशासनाकडे थेट अनधिकृत मशिदी १५ दिवसांत काढून टाकण्याची मागणी केली.