निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुतीच्या माध्यमातून लढवायच्या की स्वबळावर याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पुण्यातील शुभारंभ लॉन्स येथे पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील आमदार, खासदार, अध्यक्ष, यासह प्रमुख पदाधिकारी यांची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हानिहाय आढावा घेतला. निवडणूक लढविताना शक्य तेथे महायुतीच्या माध्यमातूनच निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महायुतीमधून निवडणूक लढवायची की स्वतंत्र याचे संपूर्ण अधिकार स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही. मात्र स्वतंत्र निवडणूक लढवितानाही मित्र पक्षावर टोकाची टीका करायची नाही, अशा स्पष्ट सूचना या बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आपत्तीग्रस्तांन् मदत मिळाली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे? या प्रश्नावर ते म्हणाले, रस्त्यावर उतरण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर येणारच नाही, दिवाळीपूर्वी मदत मिळेल.
‘प्रबळ’ पदाधिकाऱ्याला भाजपच्या प्रवेशाची दारे खुली
भारतीय जनता पक्षात येण्यासाठी अनेकांची तयारी आहे. इतर पक्षातून कोणताही ‘प्रबळ’ कार्यकर्ता, पदाधिकारी भाजपमध्ये येण्यास इच्छुक असेल तर त्याला पक्षात प्रवेश देण्याची आमची भूमिका आहे. बाहेरुन चांगला कार्यकर्ता पक्षात येत असेल तर भाजपचे कार्यकर्ते त्याला समजून आणि सामावून घेतात. यामुळेच भाजप मोठा झाला आहे. एखाद्या ठिकाणी नाराजी येते पण त्यावेळी आम्ही त्यांना समजून सांगतो आणि ते समजून घेतात, असेही मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.