पिकासोबत जमिन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या; उद्धव ठाकरेंचे आवाहन….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “अतिवृष्टी आणि पुरात उभ्या पिकासोबत शेतीही खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांना३७ हजार रुपये पॅकेजमधून आणि तीन लाख रुपये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
ही मदत शेतकऱ्यांना खरच करणार असाल तर दिवाळीपूर्वी एक लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकून दाखवा, असे आवाहन शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी(दि. ११)येथे केले.
उद्धवसेनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी शनिवारी क्रांतीचौक ते गुलमंडी असा हंबरडा मोर्चा काढला. या मोर्चाचा समारोप सभेला मार्गदर्शन करताना ठाकरे बोलत होते. यावेळी मंचावर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत, खा. ओमराजे निंबाळकर, खा.अरविंद सावंत, माजी खा.चंद्रकांत खैरे, विधान परिषदेतील माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, आ. कैलास पाटील, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ठाकरे म्हणाले की, राज्यसरकारने शेतकऱ्याने ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. यात पीक विम्याचे ५ हजार कोटी आहे. हे पैसे पीक कापणी अहवालानुसार विमा कंपनी मंजूर करणार आहे. पीकच शिल्लक राहिले नाही, तर मग पीक कापणी अहवाल आणि कंपनीकडे दावा कसा करणार असा सवाल त्यांनी केला.
राज्यसरकारचे हे पॅकेज फसवे आहे. अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे सर्वस्व वाहून गेले आहे. त्यांच्याशी बोलताना त्यांनी संकटातून पुढे जाण्यासाठी निदान हेक्टरी ५० हजाराची गरज असल्याचे सांगितले. यामुळे आम्ही ५० हजाराची मागणी केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येणार होतो. त्याचवेळी कोरोनामुळे आल्याने दिड वर्ष ही मदत देता आली नाही. नंतर मात्र ५० खोकेवाल्यांनी दगा दिल्याचे ठाकरे यांनी सांगितले. मुख्यंमत्री असताना जर मी कर्जमुक्ती करू शकतो तर तुम्ही का करीत नाही, असा सवाल ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांचे पालकत्व सरकारने घ्यायला हवे, ठाकरे म्हणाले. शेत जमिन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांना ३७ हजार रुपये आणि मनरेगातून ३ लाख देणार असल्याचे सरकार सांगत आहे. यात जर तथ्य असेल तर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना १ लाख रुपये देऊन दाखवा, असे आवाहनच ठाकरे यांनी केले.
पंतप्रधानांनी देशातील सर्व महिलांना १० हजार द्यावे
नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधान नाही तर देशाचे आहेत असा टोला ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहार मधील महिलांना त्यांनी प्रत्येकी १० हजार रुपये दिले. पी.एम. केअर फंडातून मोंदींनी देशातील सर्व महिलांना प्रत्येकी १० हजार रुपये द्यावे, अशी आपली मागणी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दिवाळीनंतर शिवसैनिक गावांत जाऊन पॅकेजची पडताळणी करणार
राज्यसरकारने शेतकऱ्यांना घोषित केलेले ३१ हजार ६२८ कोटींतील पैसे मिळाले का, याची पडताळणी करण्यासाठी शिवसैनिकांचे दक्षता पथक दिवाळीनंतर गावागावांत जातील, असे ठाकरे म्हणाले.