माजी मंत्री शामराव आष्टेकर यांचे निधन….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- “कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व माजी मंत्री शामराव आष्टेकर (वय ९१) यांचे बुधवारी पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी बिबेवाडी येथे निधन झाले. सायंकाळी पुणे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शाम ऊर्फ जनार्दन बाळकृष्ण आष्टेकर यांचा जन्म २ ऑगस्ट १९३४ रोजी कराड येथे झाला. त्यांचे शिक्षण कराड येथील टिळक हायस्कूलमध्ये झाले. कराडचे उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी १० वर्षे काम पाहिले. १९८५ साली कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. पुन्हा १९९० ला ते आमदार झाले. यादरम्यान ९ वर्षे त्यांनी क्रीडा, सांस्कृतिक व उद्योग विभागाचे मंत्रिपद भूषविले. सातारा जिल्हा व उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनदेखील त्यांनी काम पाहिले.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, भारतीय ऑलिम्पिक संघटना, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन अशा अनेक विविध संस्थांवर नेतृत्व केले. तळबीड एमआयडीसीचे स्वप्न उराशी बाळगून प्रयत्न केले. त्यामुळे कराडमध्ये एमआयडीसी स्थापन झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या या काळात कराड व सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी व पत्नी असा परिवार आहे.
राजकीय प्रवास..
सुरुवातीपासून पुरोगामी लोकशाही दल ते राष्ट्रवादी काँग्रेस हा त्यांचा राजकीय प्रवास हा शरद पवार यांच्या सोबत एकनिष्ठतेने राहिला. राजकारणामधील एक निष्कलंक, निष्ठावान व समाजाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला.