समाजा-समाजातील आजची दुही, विसंवाद अन् संघर्ष, या पापाचे धनी शरद पवार; राधाकृष्ण विखे पाटलांची प्रखर टीका….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “समाजा-समाजात आज दुही, विसंवाद आणि संघर्ष निर्माण झाला आहे, त्या पापाचे धनी शरद पवारच आहेत, अशी प्रखर टीका भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
सन 1994 साली जर पवार साहेबांनी मराठा समाजाचा समावेश केला असता तर आजची परिस्थिती नसती, असेही विखे पाटील यांनी म्हटलं. मराठा आरक्षणाच्या जीआरवरुन सध्या ओबीसी समाज आक्रमक झाला असून उच्च न्यायालयातहीयाचिका दाखल करण्यात आल्या आहेत. नुकतेच या याचिकेवरीलसुनावणीवेळी सरकारने काढलेल्या 2 सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयाला (Maratha) स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला. त्यानंतर, ओबीसी नेत्यांनी सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं.
भाजप नेते आमि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज बुलढाणादौऱ्यावर असताना त्यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण संदर्भात सुरू असलेल्या वादावर भाष्य केलं. यावेळी, मनोज जरांगे पाटील यांच्या सुरात सुर मिसळत त्यांनी थेट शरद पवांवर प्रखर टीका केली. सध्या हैदराबाद गॅझेटिअरनुसारओबीसी बांधवांच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम सुरू आहे. मात्र, मला ओबीसी बांधवांना हा प्रश्न विचारायचा आहे की, तुम्हाला आरक्षण देताना मराठा बांधवांनी कधी विरोध केला होता का? 1994 साली शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी हे पाप करून ठेवलं आहे. त्याचवेळी जर मराठा समाजाचा समावेश केला असता तर आज समाजात दुही, विसंवाद व संघर्ष राहिला नसता. या पापाचे धनी कोण? या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी शरद पवार साहेबांना विचारायला हवं, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं.
संजय राऊतांना महत्त्व देत नाही
संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. संजय राऊत हा बांग देणारा कोंबडा आहे. त्यांच्या पक्षाने त्यांना दररोज सकाळी बांग देण्यासाठी ठेवलं आहे. सामना हा पेपर फार जास्त लोक वाचत नाहीत. त्यामुळे सामना काय म्हणतो याला महत्त्व नाही, सरकारने शेतकऱ्यांना भरीव पॅकेज दिलं आहे, असे म्हणत विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्या टीकेला अधिक महत्त्व देत नसल्याचं म्हटलं.
घायवळ प्रकरणावर विखे पाटलांची प्रतिक्रिया
सचिन घायवळ हा काय व्यक्ती आहे, तुम्हाला माहित नाही.जर पोलिसांनी त्याची शिफारस केली असेल किंवा नसेल. या परिस्थितीवर गृहराज्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे. विरोधकांचं काम एकच आहे, फक्त काही झालं तर राजीनामा मागणे, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी घायवळ शस्त्र परवाना प्रकरणावर दिली.