“तुम्ही एक बिस्किटाचा पुडा तरी घेऊन गेलात का..?”, एकनाथ शिंदेंचे दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “शिवसेना (शिंदे) पक्षाचा दसरा मेळावा मुंबईतील गोरेगावमधील नेस्को सेंटर येथे आयोजित केला होता. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या विषयावर भाष्य केले. यावेळी त्यांनी राज्यातील पूर परिस्थितीवर भाष्य केले.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
आज आपण पाहतोय की बळीराजा संकटात आहे. बळीराज्याच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्यांचं दुखः मोठं आहे. त्यांची शेती वाहून गेली आहे, शेती खरडून गेली आहे. पशूधन वाहून गेले आहे, घरांची पडझड झाली आहे. मी बांधावर जाऊन आलो, मी डोळ्यांनी त्यांचं दुखः पाहिलं आणि आशा परिस्थितीत आपण त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. कारण बाळासाहेबांनी सांगितलं आहे की, ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण आणि म्हणून हा गुरूमंत्र जो शिवसेना प्रमुखांनी दिला आहे, आपण हे व्रत कधी सोडलं नाही. अनेक शिवसैनिक मदत करत आहेत. मदतीच्या गाड्या पोहचत आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
जिथे संकट तिथे शिवसेना, जिथे आपत्ती तिथे शिवसेना. जिथे संकट तिथे तुमचा हा एकनाथ शिंदे धावून गेल्याशिवाय राहाणार नाही हे आपलं धोरण आहे. मदतीचं तोरण हेच शिवसेनेचं धोरण आहे. जेव्हा जेव्हा आपत्ती येते तेव्हा मदतीला धावून जाण्याचं काम शिवसेना करते, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
सगळं उद्ध्वस्त झालं आहे, त्यामुळे आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे म्हणून आपण निर्णय घेतला की या मेळाव्यामध्ये फक्त आजूबाजूचे लोकांना बोलवलं आणि बाकी सगळे लोक तिथे मदत करत आहेत. या दसऱ्यावर पुराचं सावट आहे, अशा परिस्थितीत बळीराजाच्या मागे उभं राहण्याचं काम शिवसेना करत आहे. पाऊस अगदी वैऱ्यासारखा कोसळला, परिस्थिती भयानक आहे, अशा पऱिस्थितीत शेतकऱ्याला मदतीचा हात द्यायचा नाही तर मग कधी द्यायचा, आणि म्हणूनच यावेळेस सरकार देखील त्यांच्या पाठिसी खंबीरपणे उभी राहिल.
एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
उद्धव ठाकरेंनी पुरग्रस्तांना वाटलेल्या मदतीच्या पाकिटांवर एकनाथ शिंदेंचा फोटो असल्याच्या मुद्द्यावरून टीका केली होती. याला उत्तर देताना एकनाथ सिंदे म्हणाले की, शिवेसन आज बाधितांचे अश्रू पुसण्याचं काम करत आहे. विरोधकांना फक्त आमचे फोटो दिसतात, त्या फोटोच्या आतलं सामान दिसत नाही. २६ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू त्यांना दिल्या आहेत. गहू, तांदूळ, दाळ, साखर पासून लाडक्या बहिणींना साड्यांपासून, ब्लँकेटपासून सगळं दिलं आहे. तुम्ही एक बिस्किटाचा पुडा तरी घेऊन गेलात का? तेवढा तरी घेऊन जायचा होता? तेवढी तरी दानत दाखवायची होती.
तुमचे फोटो लावून आमचे कार्यकर्ते जल-आपत्तीवेळी मदत करत होते ना, तेव्हा बरं वाटत होतं. कार्यकर्ते फोटो लावतात. त्यावर एवढी टीका. फोटोग्राफरला काय दिसणार? फोटोच ना. काही लोक जाऊन आले. नौटंकी करून आले. पण आम्ही जाण्याच्या आधी पहिलं मदतीचे ट्रक गेले मग एकनाथ शिंदे गेला. ही आमची पद्धत आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
पूरग्रस्त भागात साथीचे आजार पसरू नये म्हणून स्वच्छता मोहिम घेतली. डॉक्टर पाठवले. काही लोक हात हालवत गेले आणि तोंड वाजवत परत आले. तुम्हाला काय अधिकार आहे. यांचे दौरे म्हणजे, खुद को चाहिए काजू बदाम, पाणी मे उतरे तो सर्दी जुकाम, अशी यांची परिस्थिती आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.