मराठवाड्याला महापूरात बुडवणारी सीना नदी कुठे उगम पावते? कुठून वाहते? अध्यात्मिक महत्त्व काय?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड :- “मराठवाड्यामध्ये आलेल्या भीषण पूराच्या केंद्रस्थानी आहे ती म्हणजे, सीना नदी! या नदीच्या आजूबाजूचा काही किलोमीटपर्यंतचा परिसर पाण्याखाली गेला आहे.
नदी किनाऱ्यावरील गावांमध्ये पाऊस थांबल्याच्या दुसऱ्या दिवशीही पाणी ओसरलेलं नाही. सीना नदीच्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीला पूराचा फटका बसला आहे. अगदी गावं असो, राष्ट्रीय महामार्ग असो किंवा शेतजमिनी असो सारं काही पाण्याखाली गेलं आहे. महाराष्ट्रभरात मागील आठवडाभरापासून सातत्याने सीन नदीचे नाव चर्चेत आहे. मात्र ही नदी नेमकी आहे तरी कुठे? तिची उगम कुठे होतो? ती कुठून-कुठपर्यंत वाहते? याबद्दल अनेकांना काहीच कल्पना नाही. त्यासंर्भातच जाणून घेऊयात…
कुठे आहे सीना नदी?
सीना नदी ही महाराष्ट्रातील भीमा नदीची एक प्रमुख उपनदी आहे. ही नदी महाराष्ट्राच्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र भागातून वाहते आणि सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीला जाऊन मिळते. सीना नदीचे पाणलोट क्षेत्र अहिल्यानगर (अहमदनगर), बीड, सोलापूर आणि धाराशिव (उस्मानाबाद) या जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. सीना नदीची एकूण लांबी सुमारे 180 किलोमीटर इतकी आहे.
सीना नदीचा उगम कुठे होतो?
सीना नदीचा उगम अहिल्यानगर जिल्ह्यातील ससेवाडी गावाजवळ जेऊर येथे होतो. तिचे तीन मुख्य शीर्षप्रवाह आहेत: एक अहिल्यानगर शहराच्या पश्चिमेस जामगावजवळ, तर दुसरे जेऊर आणि तिसरे पिंपळगाव उजनीजवळ. हे तीन प्रवाह एकत्र येऊन सीना नदी तयार होते. ही नदी अहिल्यानगर, धाराशिव (उस्मानाबाद) आणि सोलापूर जिल्ह्यांतून वाहते. बीड जिल्ह्यातील वाकी येथे महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे समाधीस्थान याच नदीच्या काठावर आहे.
सीना नदीच्या उपनद्या
उपनद्या: सीना नदीला काही छोट्या उपनद्या आहेत. भोगावती ही सीना नदीची प्रमुख उपनगदी असून इतर अनेक लहानमोठे नाले, प्रवाह नदीला वेगवेगळ्या ठिकाणी मिळतात.
सीना नदीवरील धरण
नदीवर कोळेगाव धरण बांधले गेले आहे. हे धरण उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यात आहे. हे धरण सोलापूर शहराला पाणीपुरवठा करते. तसेच, नदीच्या पाण्यामुळे सोलापूर आणि परिसरातील शेतीला फायदा होतो.
सीना नदीचे सांस्कृतिक महत्त्व
सीना नदी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासाशी जोडलेली आहे. चक्रधर स्वामींच्या समाधीमुळे ती धार्मिक पर्यटनाचे केंद्र आहे.
सीना नदीचे आर्थिक महत्त्व
सीना नदी शेती, पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी महत्त्वाची आहे. मात्र, दुष्काळ आणि पूर यांसारख्या समस्या येथे वारंवार उद्भवतात. नुकत्याच मुसळधार पावसामुळे सोलापूरमध्ये सीना नदीला महापूर आला असून, माढा आणि करमाळा तालुक्यांतील गावांना पाणी शिरले आहे. सीना नदी सामान्यतः शांत वाहते, पण पावसाळ्यात तिचे रौद्ररूप दिसते.