कुठलाही शेतकरी पंचनाम्याविना राहणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आश्वासन….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी कुठलाही शेतकरी पंचनाम्याविना राहणार नाही, असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
दररोजचा पाऊस इतका आहे की शेतकरी शेतात जायलाच घाबरत आहेत. शेतात गेल्यावर त्यांच्या डोळ्यांत अश्रू येतात. पण शासनाने पंचनामे सुरू केले आहेत. नुकसानग्रस्तांना मदत देणे हेच सरकारचे प्रमुख काम आहे. जिल्हाधिकाऱ्यांना थेट निधी काढून देण्याचे अधिकार देण्यात आले असून, मदत तत्काळ पोहोचवली जात आहे, असे त्यांनी सांगितले.
विरोधकांचे काम मागणी करणे आहे. पण आमचे सरकार नियमांनुसार मदत करेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती; मात्र ती दिली नाही. आज मात्र आमचे सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.
केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत ते म्हणाले की, पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या संकटात मदत केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांकडे आकडेवारी मांडली आहे. महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मोठी मदत मिळेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राहुल गांधींवर निशाणा साधताना बावनकुळे म्हणाले, “शेतकऱ्यांना आम्ही मदत केली नाही तर काय राहुल गांधी मदत करतील का? जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही पार पाडतो आहे.
नागपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागात आपण स्वतः भेट देऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहोत, तेथील पंचनाम्यांची स्थिती
तपासणार आहोत, असेही बावनकुळे म्हणाले.