धनंजय मुंडे म्हणाले बंजारा-वंजारी एकच, हरिभाऊ राठोडांनी सांगितला इतिहास, बंजारा तरुणांचाही कडाडून विरोध….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- “राज्यात एकीकडे मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पुरावे असलेल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्यामुळे, ह्याच हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेत बंजारा (Banjara) समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजाकडून होत आहे. बंजारा समाजाने आज बीड, जालनासह इतर जिल्ह्यात आंदोलन केले. मात्र, बीडमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात बीड (Beed) जिल्ह्यातील सर्वच नेते उपस्थित होते. त्यात, माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी बंजारा समाजाच्या निघालेल्यामोर्चादरम्यानबंजारा आणि वंजारा एकच असल्याचे म्हटले. आता, या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. येथील सभेतच बंजारा समाजातील तरुणांनी मुंडेंच्या वक्तव्याचा जोरदार विरोध केला. तर, आता हरिभाऊराठोड यांनीही धनंजय मुंडेंच वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
बीडमध्ये आयोजित बंजारा समाजाच्या आंदोलन मोर्चात धनंजय मुंडे यांचे भाषण सुरू असतान त्यांनी बंजारा आणि वंजारी एकच असल्याचे म्हटले. त्यावेळी, मोर्चातील काही तरुणांनी याला जोरदार विरोध केला. या तरुणांचा हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. बंजारा आणि वंजारा एक नाही, असे हे तरुण म्हणत आहेत. या आधी तुम्ही आमच्या ताटातले अडीच टक्के आरक्षण घेतले आहे. वंजारा-बंजारा एक आहे हा शब्द मागे घ्या, अशी मागणीही बंजारा समाजाच्या तरुणांनी घोषणाबाजी करत केली. त्यामुळे बंजारा आणि वंजारा एक या वक्तव्यावरुन धनंजय मुंडे पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. तर, बंजारा समाजाचे नेते आणि दिवंगत गोपीनाथ मुंडेंसमवेत काम केलेल्या हरिभाऊराठोड यांनीही धनंजय मुंडेंच्या वक्तव्याचा विरोध दर्शवला आहे.
बंजारा-वंजारी एक नाहीत – राठोड
बंजारावंजारी हे एक नाहीत, मी गोपीनाथ मुंडे यांचा खासगी सेक्रेटरी असताना देखील ही भूमिका घेतली होती. आपण भाऊ-भाऊ आहोत, सामाजिकदृष्ट्या ठीक आहे. मात्र, आरक्षणाच्या बाबतीत तुम्हाला वेगळं आरक्षण दिले पाहिजे, असे परखड मत बंजारा समाजाचे नेते हरिभाऊराठोड यांनी व्यक्त केले. यापूर्वीच मी ही बाब सांगितलेली आहे. त्यामुळे, तो फॉर्मुला आत्ता वापरायला नको, असेही राठोड यांनी म्हटले.
काय म्हणाले धनंजय मुंडे
हैदराबाद गॅझेटमध्ये वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळं आरक्षण आहे. त्यानुसार आता आधीचे एसटी आणि नव्याने येऊ घातलेले एसटी यांचा मेळ घालावा, त्याचा अभ्यास करावा. त्यानुसार संविधानाच्या चौकटीत बसवून आरक्षण द्यावं अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. बंजारा आणि वंजारी वेगवेगळे आहेत का? हे दोन्ही समाज एकच आहेत असंही धनंजय मुंडे म्हणाले.
बीड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अनेक नद्या नाल्यांना महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा जोर कायम राहणार असल्याने बीड जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळा, अंगणवाडी, आश्रम शाळा, महाविद्यालय यांनाही उद्या 16 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांनी म्हटले आहे.