आरक्षणाच्या मागणीवरून राजकारण तापलं..! शिदेंच्या आमदाराने दिला थेट इशारा….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यात आरक्षणाच्या मागणीवरून चांगलंच वातावरण तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य शासनाने मराठा समाजासाठी जीआर काढत हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला.
सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे ओबीसी समाजात नाराजी पसरली असून आंदोलन करण्याच्या पवित्र्यात ओबीसी समाज आहे. दसऱ्यानंतर मुंबईत ओबीसींचा महामोर्चा निघणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर दुसरीकडे बंजारा समाजानेही आंदोलनाचे हत्यार उपसले असून अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.
परंतु, बंजारा समाजाच्या या मागणीला नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनी विरोध केला आहे. बंजारा आणि धनगरांना जर एसटी प्रवर्गातून आरक्षण दिलं तर सरकारमधून बाहेर पडणार असल्याचा थेट इशारा आमिश्या पाडवी यांनी दिला आहे. आमश्या पाडवी यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.
राज्य शासनाने मराठा समाजाच्या कुणबी नोंदीसाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर काढला. या आधारे कुणबी नोंदी शोधून त्यांना कुणबी सर्टिफेकेट देण्यात येणार आहे. त्याच आधारे आता बंजारा समाजाकडून अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजानेही अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाले आमिश्या पाडवी?
हैदराबाद गॅझेट लागू झाले म्हणून कुणीही आदिवासी प्रवर्गात येईल असं होणार नाही. आदिवासी बनण्यासाठी आदिवासींच्या पोटी जन्म घ्यावा लागतो. बंजारा समाजाने कितीही आंदोलनं केली तरी आम्ही त्यांना आदिवासींमध्ये येऊ देणार नाही. धनगर आणि बंजारा समाजाला आदिवासींमध्ये घुसू देणार नाही, असं पाडवी म्हणाले. मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू केलं आहे, त्यामुळे त्याविषयी मराठा समाजाने बघावं. आम्ही आमची लढाई लढणार आहोत. मी जोपर्यंत आमदार आहे तोपर्यंत कुणालाही आदिवासींमध्ये घुसू देणार नाही असा थेट इशारा आमदार आमश्या पाडवी यांनी दिला आहे.