पाकिस्तानसोबत क्रिकेट..? – केंद्र सरकारच्या दुटप्पी धोरणाविरोधात विलेपार्लेत उद्धव सेनेचं आंदोलन….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “पहलगामच्या भ्याड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या केंद्र सरकारच्या दुटप्पी धोरणा विरोधात आज दुपारी उद्धव सेना विलेपार्ले विधांनसभेने विलेपार्ले पूर्व रेल्वे स्थानका बाहेर जोरदार आंदोलन केले.
विभाग क्रमांक ५ तर्फे उद्धव सेनेचे नेते,आमदार अँड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली, महिला आघाडीने “कुंकू व बांगड्या” या संकल्पनेवर आंदोलन केले.या कार्यक्रमाचे नेतृत्व महिला संघटिका रजनी मिस्त्री यांनी केले. या वेळी मोठ्या संख्येने महिला तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसैनिक व महिलांनी हातात घोषणा फलक घेऊन केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. “पाकिस्तानला ठोस उत्तर द्या”, “दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्यांशी क्रिकेट नाही”, “भारताचा अपमान खपवून घेतला जाणार नाही” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
केंद्र सरकारवर दुटप्पी धोरणाचा आरोप
अनिल परब यांनी केंद्र सरकारवर दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप केला. एकीकडे, देशावर दहशतवादी हल्ले होत असताना, दुसरीकडे त्या हल्ल्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने खेळण्यास परवानगी देणे हे अत्यंत निषेधार्ह असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
देशाच्या सुरक्षेशी निगडित असलेल्या गंभीर विषयावर केंद्र सरकार केवळ राजकारण करत आहे, आणि त्याची किंमत देशाच्या नागरिकांना आणि जवानांना मोजावी लागत असल्याची टिका त्यांनी केली.
रंजना मिस्त्री म्हणाल्या की,देशाचे जवान, नागरिक रक्त सांडत असताना, पाकिस्तानशी मैदानावर मैत्रीची भाषा करणे हे शहीदांच्या बलिदानाचा अपमान आहे. केंद्र सरकारने किमान या प्रकरणी राष्ट्रीय भावना ओळखून कठोर निर्णय घेतला पाहिजे होता.