पुसदची कन्या (ISRO शास्त्रज्ञ) डॉ. प्रिया शेजुळे ची पुसद शहरात भव्य रॅली मिरवणूक ; ढोल-ताशांच्या गजरात भव्य रॅली ; “माझ्या वाटचालीचा पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घातलेल्या शिक्षण क्रांतीत आहे” :- डॉ. शेजुळे…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- पुसद तालुक्याच्या कन्या डॉ. प्रिया शेजुळे यांची नुकतीच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे संशोधन शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. या ऐतिहासिक यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी आज पुसद शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.
सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. ओपन जिप्सीमधून डॉ. प्रिया शेजुळे यांचा सत्कार करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात व पायदळ मिरवणुकीसह रॅली महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोहोचली. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी करत कार्यक्रमाची सांगता झाली.
आयोजक
या सोहळ्याचे आयोजन भीम टायगर सेना, वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाचे नेतृत्व किशोर कांबळे (जिल्हाध्यक्ष – भीम टायगर सेना), बुद्धरत्न भालेराव (तालुकाध्यक्ष – वंचित बहुजन आघाडी), भारत कांबळे (तालुकाध्यक्ष – भारतीय बौद्ध महासभा), कृष्णा जाधव (एमआयएम जिल्हा संघटक) यांनी केले.
यावेळी प्रभाकर खंदारे, देवानंद साठे, जनार्दन झोडगे, दीपक गायकवाड, सुरेश कांबळे, महेंद्र कांबळे, जगदीश साळवे, मधुकर सोनवणे, जयानंद भालेराव, पंजाबराव डाखोरे, धम्मा केवटे, बबन पाईकराव, विजय बहादुरे,संदीप आढाव ,ल. पू. कांबळे, संतोष गायकवाड,सुखदेव भगत, विष्णू सरकटे यांसह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. प्रिया शेजुळे यांचे विचार
“आज मी जे काही आहे ते माझ्या कुटुंबीय, शिक्षक आणि समाजाच्या प्रेरणेने. पण यामागे सर्वात मोठा वाटा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. त्यांनी दिलेल्या शिक्षणाच्या अधिकारामुळे आणि विज्ञानाकडे नेलेल्या प्रगत दृष्टीकोनामुळेच माझा प्रवास शक्य झाला. भावी पिढ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांना बळ देत विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात धाडसाने पुढे यावे, अशी माझी अपेक्षा आहे,” असे डॉ. प्रिया शेजुळे यांनी सांगितले.
पत्रकार संवाद
कार्यक्रमानंतर विविध पत्रकारांनी डॉ. प्रिया शेजुळे यांची मुलाखत घेतली. त्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
समाजाचा अभिमान
डॉ. प्रिया शेजुळे यांच्या या अभूतपूर्व यशामुळे पुसद शहरासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचा मान उंचावला आहे. तरुणाईसमोर नवा आदर्श निर्माण झाला असून रॅलीत सहभागी नागरिकांनी या यशाचा उत्स्फूर्त आनंद साजरा केला.