“आम्ही मराठा म्हणूनच आरक्षण घेणार”, मराठा क्रांती मोर्चाचा पुन्हा एकदा सरकारला इशारा….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. कुणबी वर्गीकरणावरून सुरू झालेला वाद आता अधिक तीव्र झाला असून, मराठा क्रांती मोर्चाने याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे.
राज्य समन्वयक सुनील नागणे (sunil nagne) यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, ‘आम्हाला आरक्षण कुणबी म्हणून नको, ते मराठा म्हणूनच हवे आहे आणि तेही ५० टक्क्यांच्या आतून.’
अलीकडेच सरकारने हैदराबाद गॅझेटियरनुसार जात प्रमाणपत्र मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यावर आक्षेप नोंदवत नागणे यांनी म्हटले की, ‘सरसकट हा शब्द वगळून जर आरक्षण दिले गेले, तर ते कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही. मराठा म्हणून नोंद असलेल्यांना कुणबी म्हणणे योग्य ठरणार नाही.’ त्यांनी पुढे स्पष्ट केले की, गेल्या ४५ वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करत आहे. अशा वेळी कुणबी आरक्षणाचा मार्ग हा समाजासाठी टिकाऊ ठरणार नाही.
पत्रकार परिषदेत नागणे यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांच्याशी मतभेद असल्याचेही फेटाळले. ‘आमचा जरांगे यांना विरोध नाही. पण आमची भूमिका वेगळी आहे. आम्ही मराठा म्हणूनच आरक्षण घेऊ इच्छितो. कुणबी आरक्षण हा पर्याय आम्हाला मान्य नाही.’ असे ते ठामपणे म्हणाले.
नागणे यांनी आंदोलनकर्त्यांच्या त्यागाची आठवण करून दिली. ‘गेल्या २५ वर्षांपासून ५०० हून अधिक लोक आरक्षणासाठी लढत आहेत. अनेकांनी घरदार विकले, जमीन सावकारांकडे गहाण ठेवली, तरीही ते आपल्या प्रसिद्धीसाठी नव्हे तर समाजासाठी लढत आहेत. कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता, केवळ संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आम्ही आरक्षण मागत आहोत.’ असे त्यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणावर सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करण्याची मागणीही नागणे यांनी केली. ‘आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर आमचे भविष्यच धोक्यात येईल. म्हणून आम्ही हटणार नाही. हे कोणाच्या विरोधात नसून, आमच्या हक्काबाबतची ठाम भूमिका आहे. सरकारने मराठा म्हणूनच आरक्षण द्यावे.’ असा इशाराही त्यांनी दिला.