नवी मंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पेटला….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी मुंबई :- “नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून ठाणे, मुंबईतील भूमीपुत्र करत आहेत.
रविवारी याच मागणीसाठी एका वेगळ्याच रॅलीचे आयोजन भूमीपुत्रांनी केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी नेमके काय केले जाणार आहे पाहूया.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, ठाणे नवी मुंबई, कल्याण, बदलापूर भागात लाखो आगरी कोळी बांधव वास्तव्यास आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक आदी जिल्ह्यांतील लाखो प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी अनेक आंदोलने केली. या विमानतळाच्या नामकरणासाठी हजारोंच्या संख्येने मोर्चे देखील निघाले होते. या आंदोलन आणि मोर्चामुळे राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा ठराव मंजूर केला आणि तो पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला. परंतु सरकारकडून याबाबत हालचाली होत नसल्याचा आरोप आता केला जात आहे.
भिवंडी ते उरणच्या जासई पर्यंत रॅलीचे आयोजन
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मागणीकडे केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एका अनोख्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी भिवंडी ते उरण येथील जासई पर्यंत दिबा मानवंदना कार रॅली काढली जाणार आहे. या रॅलीमध्ये भूमीपुत्र त्यांच्या कार घेऊन रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. भिवंडीचे लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्या नेतृत्त्वाखाली ही रॅली काढली जाणार आहे. या रॅलीचा समारोप जासई येथे होणार आहे.