‘जरांगेंना हात लावला, तर मुस्लिम समाज छातीचा कोट करून रस्त्यावर उतरेल’; इम्तियाज जलील यांचा थेट इशारा….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणावर बसले आहेत. आज (२ सप्टेंबर) त्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. आंदोलन गुंडाळण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या असून मुंबई पोलिसांनी आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे.
दुपारी ३ वाजेपर्यंत मैदान मोकळे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या आंदोलनादरम्यान तणाव वाढला आहे.
दरम्यान, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी इशारा देत सांगितले की, “जर पोलिसांनी बळजबरी केली, जरांगे यांना हात लावला तर मुस्लिम समाज छातीचा कोट करून रस्त्यावर उतरेल. आम्ही त्यांच्या सुरक्षेसाठी सर्वात पुढे उभे राहू.”
मुंबई पोलिस ‘ॲक्शन मोड’वर…
मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे यांच्या आंदोलनाची गंभीर दखल घेतली आहे. न्यायालयाने दुपारी तीन वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिल्याने मुंबई पोलिस ‘ॲक्शन मोड’वर आले आहेत. मुंबई व नवी मुंबईत तब्बल ६० हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. चौकाचौकातील आंदोलकांची वाहने आणि आंदोलक हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
असदुद्दीन ओवेसी यांचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा
जलील म्हणाले, “पहिल्या दिवसापासून एमआयएमचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. हा मुद्दा लोकसभेतही मांडला आहे. जरांगे पाटील यांची आरक्षणाची मागणी योग्य आहे आणि सरकारने ती पूर्ण करायलाच हवी. आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न चुकीचा आहे.”
…तर सरकारला परिणाम भोगावे लागतील
ते पुढे म्हणाले, “मी स्वतः जरांगे पाटलांचा चाहता असून त्यांच्यासोबत कायम राहणार आहे. मुस्लिम समाज व MIM चा या आंदोलनाला 200 टक्के पाठिंबा आहे. जर सरकार अथवा पोलिसांनी बळजबरी केली, तर त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. मराठा समाजासोबत मुस्लिम समाज खांद्याला खांदा लावून उभा राहील,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.