“अमित शाह यांचे शीर धडापासून वेगळे करा,” महुआ मोईत्रा यांचे वादग्रस्त विधान; नेमकं काय म्हणाल्या..?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “सध्या बांगलादेशी स्थलांतरितांचा मुद्दा तापला आहे. प्रत्येक पक्ष यावर आपले मत व्यक्त करत आहे. यावरूनच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात तृणमूल काँग्रेस (टीएमसी)च्या खासदार महुआ मोईत्रा यांनी अपमानास्पद वक्तव्य केल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
बेकायदा बांगलादेशी स्थलांतरितांच्या भारतातील घुसखोरीबद्दल पत्रकारांशी बोलताना त्यांनी वादग्रस्त विधान केले. नेमका वाद काय? महुआ मोइत्रा काय म्हणाल्या? भाजपाने काय प्रत्युत्तर दिले? जाणून घेऊयात.
महुआ मोइत्रा काय म्हणाल्या?
पश्चिम बंगालमधील कृष्णनगरच्या लोकसभा खासदार महुआ मोईत्रा यांनी म्हटले की, अमित शाह यांचे शीर धडापासून वेगळे केले पाहिजे आणि ते प्रदर्शनार्थ टेबलावर ठेवले पाहिजे.
“जर भारताच्या सीमांचे रक्षण करता येत नसेल, जर शेकडो घुसखोर आत येत असतील, आपल्या महिलांचा अनादर करत असतील आणि आपल्या जमिनी बळकावत असतील, तर अमित शाह यांचे शीर धडापासून वेगळे करून टेबलावर ठेवणे हे तुमचे कर्तव्य आहे,” असे मोईत्रा म्हणाल्या.
त्यांनी घुसखोरीच्या मुद्द्यावर केंद्राकडून स्पष्टीकरण मागितले आणि दावा केला की, घुसखोर देशात येत आहेत आणि महिलांच्या प्रतिष्ठेचा अपमान करत आहेत, असे स्वतः पंतप्रधानांनी मान्य केले आहे. “ही कोणाची चूक आहे? ही आमची चूक आहे की तुमची?” असा प्रश्नही त्यांनी विचारला. पश्चिम बंगालसारख्या सीमावर्ती राज्यांमध्ये बेकायदा स्थलांतराची चिंता वाढत चालली आहे. यासाठी त्यांनी थेट केंद्रीय नेतृत्वाला जबाबदार धरले आहे.
भाजपाची प्रतिक्रिया काय
भाजपाचे नेते प्रदीप भंडारी म्हणाले की, असे वक्तव्य राजकारणाच्या पलीकडचे असून, हे निव्वळ द्वेषपूर्ण आहे.” त्यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट लिहून म्हटले, “घृणास्पद, लाजिरवाणे! महुआ मोईत्रा यांचे ते वाक्य राजकारणाच्या पलीकडचे आहे, ते निव्वळ द्वेषपूर्ण भाषण असून त्यात विष भरले आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा दर्जा इतका घसरला आहे; त्यातून तृणमूलची हिंसक संस्कृती समोर आली आहे. “
घुसखोरीत वाढ
नरेंद्र मोदी सरकारने भारतात राहणाऱ्या बेकायदा बांगलादेशी स्थलांतरितांना बाहेर काढण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. ‘सीएनएन-न्यूज१८’ला मिळालेल्या केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत स्थलांतरितांना बाहेर काढण्याचे प्रमाण ३,५३६ होते. २०२४ मध्ये हा आकडा केवळ १,०४९ होता.
हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि आसाममध्ये पोलिसांनी अनधिकृत वसाहतींमध्ये कारवाई सुरू केली आहे आणि अनेक बेकायदा स्थलांतरितांना ताब्यात घेतले आहे. बांगलादेशातून होणारी घुसखोरी अजूनही चिंतेचा विषय आहे. मात्र, आकडेवारीनुसार मागील वर्षांच्या तुलनेत त्यात किंचित घट झाली आहे. १५ जुलै २०२५ पर्यंत सीमा सुरक्षा दलाने (BSF) १,३७२ घुसखोरांना अटक केली. २०२४ मध्ये ही संख्या २,४२५ होती.
एका बीएसएफ अधिकाऱ्याने सांगितले की, “अटकेच्या घटनांमुळे अधिक बेकायदा बांगलादेशी स्वतःहून भारताच्या कुंपण नसलेल्या भागातून सीमेपलीकडे जात आहेत. त्यातील काहींना बीएसएफने ताब्यात घेतले आहे आणि तपासणीनंतर बांगलादेशच्या बॉर्डर गार्ड्सनी (BGB) त्यांना देशात घेतले आहे.”
स्वतःच्या पक्षातील नेत्याचा ‘डुक्कर’ असा उल्लेख
गेल्या महिन्यात पक्षांतर्गत वादाने आणि स्वतःच्या पक्षातील नेत्याविरोधात वादग्रस्त शब्दांचा वापर केल्याने महुआ मोइत्रा चर्चेत आल्या होत्या. त्यांनी खासदार कल्याण बॅनर्जी यांचा ‘डुक्कर’ (Pig) असा उल्लेख केला होता. इंडिया टूडेशी एका पॉडकास्टच्या माध्यमातून बोलताना त्यांनी ही टीका केली.
महुआ मोइत्रा यांनी अलीकडेच पिनाकी मिश्रा यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. या लग्नाबद्दल कल्याण बॅनर्जी यांनी केलेल्या टिप्पणीवर मोइत्रा पॉडकास्टमध्ये बोलत असताना खेद व्यक्त केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, “तुम्ही डुकराबरोबर कुस्ती करू शकत नाहीत. तुम्ही चिखलात लोळावं अशी डुकराची इच्छा असते. तुम्ही डुकरासारखे घाणीत लोळलात तर ते आनंदी होतं. भारतात महिलांचा तीव्र द्वेष करणारे, लैंगिकदृष्ट्या निराश व भ्रष्ट पुरूष खूप आहेत. वेगवेगळ्या पक्षांकडून ते संसदेत प्रतिनिधीत्व करत आहेत,” असे त्या म्हणाल्या होत्या.
महुआ मोइत्रा याना प्रत्युत्तर देत खासदार बॅनर्जी म्हणाले, “जे लोक प्रत्युत्तर म्हणून शिवीगाळ करतात, त्यांनी एकदा तरी विचारमंथन करावं की ते नेमकं कुठल्या प्रकारचं राजकारण करत आहेत. या अशा वक्तव्यामुळे ही मंडळी आतून किती पोकळ आहे ते समोर येतं. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी शिवीगाळ करू लागते, आक्षेपार्ह शब्दांचा वापर करून प्रत्युत्तर देऊ लागतो, अश्लील व्यंगाच्या माध्यमातून उत्तर देऊ लागतो तेव्हा ती त्याची ताकद नसते तर त्याच्या असुरक्षिततेची भावना त्याला असं करायला भाग पाडते.”