ड्युटीवर कार्यरत असतांना पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर हृदयविकाराच्या झटक्याने निधन….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मारेगाव :- “यवतमाळमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. यवतमाळच्या मारेगाव पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते नुकतेच पोलीस निरीक्षक म्हणून मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये रुजू झाले होते. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारेगाव पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. उमेश बेसरकर यांची पुसद येथून मारेगाव येथे १४ जून २०२५ रोजी बदली झाले होती. बेसरकर हे मूळचे नागपूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
कर्तव्य बजावत असताना अचानक उमेश बेसरकर यांच्या छातीत दुखायला सुरुवात झाली. त्यांना उपचारांसाठी यवतमाळच्या वणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ठाणेदार उमेश बेसरकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे मारेगाव बाजारपेठेत सन्नाटा पसरला आहे.
काल (२२ ऑगस्ट) बैल पोळा सणाच्या निमित्ताने पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चांगला बंदोबस्त लावला होता. त्यांच्यामुळे बैलपोळा सणादरम्यान कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नव्हता. बेसरकर यांच्या अचानक जाण्याने यवतमाळ पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.