‘आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू’, तेजस्वी यादवांची घोषणा….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवादा :- “काँग्रेस नेते राहुल गांधी ‘मतदार हक्क यात्रे’निमित्त बिहारचा दौरा करत आहेत. राजद नेते तेजस्वी यादव हेदेखील त्यांच्यासोबत या यात्रेत सहभागी आहेत. मंगळवारी त्यांची ही यात्रा नवादा येथे पोहोचली आहे.
यावेळी तेजस्वी यांनी एक मोठे विधान केले आहे. ‘तुम्ही पुढच्या लोकसभा निवडणुकीत आमच्या महाआघाडीला मतदान करा, आम्ही राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू,’ असा दावा तेजस्वी यांनी केला आहे.
तेजस्वी यांचा भाजपवर हल्लाबोल
नवाडा येथे मतदार हक्क यात्रेला संबोधित करताना तेजस्वी यादव म्हणाले की, ‘भाजप लोकांकडून मतदानाचा अधिकार हिसकावून घेऊ इच्छित आहे. निवडणूक आयोग आणि भाजपच्या लोकांना वाटते की, ते बिहारच्या लोकांना फसवतील. आम्ही बिहारी आहोत, हे त्यांनी लक्षात ठेवावं. मुख्यमंत्री नितीश कुमार बेशुद्धावस्थेत आहेत. त्यांचे २० वर्षांचे जीर्ण सरकार उखडून टाकावे लागेल. कोणत्याही जातीचा असो वा धर्माचा, आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाऊ. आपण नवीन युगाचे लोक आहोत, बिहार हे सर्वात तरुण राज्य आहे, हे सरकार आपल्या तरुणांच्या भविष्याशी खेळत आहे,’ अशी टीकाही तेजस्वी यांनी केली.
राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांना इशारा दिला की, जेव्हा त्यांचे सरकार स्थापन होईल, तेव्हा ‘मत चोरी’ विरोधात कठोर कारवाई केली जाईल. संपूर्ण देश निवडणूक आयोगाकडून प्रतिज्ञापत्र मागेल आणि वेळ मिळाल्यास त्यांचा पक्ष प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात ‘मत चोरी’ उघड करेल. ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारसाठी विशेष पॅकेजबद्दल बोलतात, त्याचप्रमाणे निवडणूक आयोगानेही बिहारसाठी ‘नवीन विशेष पॅकेज’ आणले आहे. त्याचे नाव एसआयआर आहे, जे ‘मत चोरीचे एक नवीन रूप’ आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.