“दंगल भडकवू नका, अन्यथा महाराष्ट्र कायमचा बंद राहील”, जरांगे पाटलांचा इशारा, फडणवीस-हाकेंवर गंभीर आरोप….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी परभणी दौऱ्यावर असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि लक्ष्मण हाके यांना थेट आणि गंभीर इशारा दिला आहे. आगामी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या तयारीसाठी त्यांनी संवाद दौरा सुरू केला असून, या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या भाषणात अनेक गंभीर आरोप आणि विधानं केली.
परभणी शहरातील सावली विश्रामगृह येथे दिवसभर थांबून, त्यांनी परभणी जिल्ह्यातील विविध गावांतील मराठा समाज बांधवांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या ऐकल्या आणि आंदोलनाच्या नियोजनावर चर्चा केली. या संवादादरम्यान जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप करत म्हणाले, “फडणवीस यांनी सर्व ओबीसी नेत्यांना गोव्यात नेऊन त्यांचे कान भरले असून, त्यानंतर आंदोलनाच्या काळात राज्यात दंगल भडकवण्याचा डाव आखला जात आहे. मला याची कुनकून आधीच लागली असून, आता लोकही याबद्दल चर्चा करू लागले आहेत. मात्र आमचं आंदोलन हे शांततेत होणार आहे. फडणवीस यांनी जर तसं काही करण्याचा विचार केला तर महाराष्ट्र कायमस्वरूपी बंद राहीलच, शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मोठा त्रास सहन करावा लागेल,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
मनोज जरांगे पाटील यांनी परभणीत मुख्यमंत्री आणि लक्ष्मण हाके यांना गंभीर इशारा दिला.
देवेंद्र फडणवीसांवर दंगल भडकवण्याचा डाव आखल्याचा आरोप केला.
२९ ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा आरक्षणासाठी मोठं आंदोलन होणार आहे.
आंदोलन शांततेत होईल पण दंगल झाल्यास महाराष्ट्र कायम बंद राहील असा इशारा.
लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिउत्तर देताना जरांगे म्हणाले की, “मराठा आरक्षणाबद्दल बोलणाऱ्या हाकेला मी मोजतच नाही. त्याला जर खरी हिंमत असेल, तर गरीब धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्याची मागणी करावी आणि त्यासाठी आंदोलन करावं. आमच्याकडे येऊन काही उपयोग नाही, कारण आम्ही आधीच सगळे मराठी ओबीसींमध्ये समाविष्ट केले आहेत. आता जे उरले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत.”
पुढे जरांगे यांनी स्पष्ट केलं की, फडणवीसांच्या ऐकून काही लोक धनगर आणि मराठा समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु ते यशस्वी होणार नाहीत. “आमचं आंदोलन शांततापूर्ण असेल, पण कोणी दंगल भडकवण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम गंभीर असतील,” असं ते म्हणाले.
येत्या २९ ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या या आंदोलनाकडे राज्यातील सर्व समाजघटकांचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात तापलेला आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की, “आमची मागणी न्याय्य आहे आणि ती पूर्ण होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही.” सध्या मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलेलं असून, सरकार, विरोधक, आणि विविध समाजघटक यामध्ये उघडपणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशा पार्श्वभूमीवर जारंगे पाटील यांचा हा परभणीतील इशारा आगामी आंदोलनाला आणखी तीव्र वळण देऊ शकतो.