हिंदू धर्माला बदनाम करणाऱ्यांना कोर्टाची चपराक; आता काँग्रेसनं माफी मागावी, चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. केवळ संशयाच्या आधारावर आरोपीना दोषी ठरवू शकत नाही.
त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे, असं एनआयएच्या विशेष न्यायालयाकडून सांगण्यात आले. 1000 पानांहून अधिक पानांचा निकाल असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी (Malegaon Blast Case Verdict) न्यायालयाने आज (31 जुलै) निकाल सुनावण्यात आला. मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल येताच विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. आता भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मालेगाव प्रकरणी सत्य बाहेर आलं आहे. त्यामुळे आता काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका दीर्घकाळ चाललेल्या राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश आहे, असं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले. सर्व आरोपांमागे कोणताही ठोस पुरावा नाही, हे न्यायालयाने स्पष्टपणे नोंदवलं. पण याहून गंभीर बाब म्हणजे काँग्रेसनं जाणीवपूर्वक ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्दप्रयोग प्रचारात वापरत हिंदू समाजाला, श्रद्धेला, जगभरात बदनाम करण्याचा प्रयत्न केला. शतकानुशतकं मानवतेचं आणि सहिष्णुतेचं प्रतीक असलेल्या हिंदू धर्माला दहशतवाद्यांच्या रांगेत उभं करण्याचा अक्षम्य गुन्हा काँग्रेसने केला असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली. आज कोर्टाने सत्य मांडलं, आता काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागायला हवी, अशी मागणी देखील चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. हिंदू कधीच दहशतवादी नव्हता आणि नसेलही…न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने हिंदूंना बदनाम करणाऱ्यांना मोठी चपराक मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली.
जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आलेले नाही- न्यायालय
बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं. पण ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं न्यायालयाने सांगितलं. तपासात अनेक त्रुटी होत्या. या सगळ्या त्रुटीचं वाचन देखील न्यायालयात करण्यात आले. पंचनामा योग्य नव्हता. जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाही, असं निरिक्षणही न्यायालयाने नोंदवलं. चेसीस नंबर दुचाकीचा देखील कधी रिकव्हर करण्यात आला नाही. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर दुचाकीची मालक होती हे देखील स्पष्ट नाही, असं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. आरडीएक्स कर्नल प्रसाद पुरोहितांनी आणलं याचा पुरावा नाही, असंही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. सगळ्या आरोपींना संशयाचा फायदा बेनिफिट ऑफ डाऊट आहे. केवळ संशयाच्या आधारावर आरोपीना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे, असं न्यायालयाकडून सांगण्यात आले.