“तुमच्या तर दिव्याखालीच अंधार”; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी एक घटना पुण्यात घडली. माजी मंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला रेव्ह पार्टीमध्ये रंगेहाथ पकडण्यात आले.
खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे पतीच रेव्ह पार्टीत सापडल्याने भाजपने घेरलं आहे. भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांना खडेबोल सुनावले.
पुण्यातील खराडी भागात सुरू असलेली रेव्ह पार्टी पुणे पोलिसांनी उधळली. या घटनेनंतर आमदार चित्रा वाघ यांनी ट्विट करत सुप्रिया सुळे आणि रोहिणी खडसेंना लक्ष्य केले.
“ड्रग्ज कुठून येतात, हे स्वतःच्या नवऱ्याला विचारा”
आमदार चित्रा वाघ म्हणाल्या, “ओఽఽఽఽఽ १२मतीच्या मोठ्ठया ताई… सुप्रिया सुळे, तुमच्या तर दिव्याखालीचं अंधार होఽఽఽ. तुमच्या वाजंत्रीताई महाराष्ट्रात ड्रग्स येतात कुठून हा प्रश्न सरकारला विचारतात; त्याआधी त्यांनी स्वत:च्या नवऱ्याला प्रांजल खेवलकरना हा प्रश्न विचारायला हवा”, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.
“तुमचा नवरा लहान नाही की, त्याला…”
“महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेत सरकारला जबाबदार धरणाऱ्या, आमच्या नावाने कायम तुतारी वाजवणाऱ्या वाजंत्री ताईंनी आधी स्वत:च्या घराकडे लक्ष द्यावे आणि हो, तुमचा नवरा लहान नाही की त्याला कोणी उचलून आणून रेव्ह पार्टीत बसवेल नाही; तर यात ही पुन्हा सरकारलाच जबाबदार धराल”, असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी रोहिणी खडसेंना लगावला.
“राज्यात जेव्हापासून देवाभाऊंचे भाजपा-महायुतीचे सरकार आलंय, तेव्हापासून ड्रग्सची प्रकरणे बाहेर येत आहेत. आधी ती बेमालूमपणे का लपवली जायची? कोण लपवायचे, याचे गूढ इथेच कुठेतरी दडलं आहे की काय? असा प्रश्न महाराष्ट्राला पडतोय”, असा गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.
“गुन्हे उघड झाल्यावर वाजंत्रीताई चोराच्या उलट्या बोंबा मारायला पुढे येतात हेही गुपित उघड झालं”, असा टोला चित्रा वाघ यांनी रोहिणी खडसेंना लगावला आहे.
पाच पुरुष, दोन महिला आणि मादक पदार्थ
पुण्यातील खराडी भागात असलेल्या एका उच्चभ्रू वसाहतीमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. पोलिसांनी धाड टाकली, तेव्हा दोन महिला आणि पाच पुरूष आढळून आले. पोलिसांना रेव्ह पार्टी सुरू असलेल्या फ्लॅटमध्ये मादक पदार्थ आढळून आले. पोलिसांनी सर्व साहित्य जप्त केले आहे. सात जणांना ताब्यात घेतले आहे.
एकनाथ खडसे यांचा जावई आणि रोहिणी खडसे यांचे पतीच या रेव्ह पार्टीत सापडल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप जोरात सुरू आहे. राज्यात हनी ट्रॅपचे प्रकरण गाजत असतानाच ही रेव्ह पार्टी प्रकरण पुढे आले.