महाराष्ट्र मंत्रिमंडळात होणार फेरबदल, 8 विकेट पडणार… ‘हे’ मंत्री हिटलिस्टवर..!

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
महायुती सरकारमधील 8 वादग्रस्त आणि काही दिग्गज मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटातील काही मंत्र्यांवर ही गंडांतर येण्याची शक्यता आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि जनमानसातील प्रतिमेसाठी हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.या संभाव्य बदलांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून, याचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले असले तरी, सरकार स्थापन झाल्यानंतर काही मंत्री आणि आमदारांच्या वादग्रस्त भूमिका आणि वर्तनामुळे जनतेमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात काही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचेही समोर आले आहे. या सर्व बाबींचा विचार करून राज्य मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, इतर पक्षांतील काही दिग्गजांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याचीही चर्चा आहे.
हे आठ मंत्री हिटलिस्टवर
भाजप:
भाजपकडून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेल्या मत्स्यविकास मंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची वादग्रस्त पार्श्वभूमी पाहता त्यांच्या मंत्रिपदाला धोका निर्माण झाला आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांना पक्षाच्या गरजेपोटी मंत्रिमंडळाबाहेर थांबावे लागण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे गट:
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या तीन ते चार मंत्र्यांना मंत्रिमंडळातून नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये वादग्रस्त ठरलेले सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, रोहयो मंत्री भरत गोगावले, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा समावेश असू शकतो.
अजित पवार गट:
संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांनी आधीच राजीनामा दिल्यानंतर आता सातत्याने वादग्रस्त ठरलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे. नरहरी झिरवळ यांनाही मंत्रिपद गमवावे लागण्याची शक्यता आहे.
राहुल नार्वेकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार?
दुसरीकडे, या फेरबदलात विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा आहे. तर राहुल नार्वेकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. सध्या सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधानसभा अध्यक्षपद दिले जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कोकाटेंचं कृषीमंत्रीपद जाणार? अजित पवारांचा प्लॅन B तयार
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंकडून कृषी खाते काढून घेतले जाणार असल्याची माहिती समजते. कोकाटेंचं खातं बदललं जाणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यासंदर्भात शुक्रवारी (25 जुलै) निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र कोकाटे मंत्रिमंडळातच राहाणार असून केवल खातेबदल केला जाईल, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.