लोकलचा प्रवास गारेगार होणार! रेल्वेच्या सर्व डब्यात एसी असणार, तिकीटदरातही वाढ नाही; मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. लवकरच मुंबई लोकल ट्रेनमध्ये मेट्रोसारखे एसी कोचेस उपलब्ध होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
प्रवाशांना या सुविधासाठी तिकीटदरात वाढ होणार नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या एसी कोचेसमध्ये बंद होणारे दरवाजे असतील. हे कोचेस पूर्णपणे नवे असतील, यात रेट्रोफिटिंग नसेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये फडणवीस बोलत होते.
मुंब्रा येथे मोठी रेल्वे दुर्घटना झाली होती. लोकल ट्रेनला दरवाजे नसल्याने अपघात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. लोक दाटीवाटीने प्रवास करत आहेत. आज दोन क्लास तयार करण्यात आले आहेत. मेट्रो ही पूर्णपणे वातानुकूलित आहे, शिवाय त्याचे दरवाजे बंद होतात. एसीमुळे प्रवाशांचा प्रवास सुखदायी होतो. एका बाजूला मेट्रो आहे, तर दुसऱ्या बाजूला लोकल रेल्वे आहे. लोक गर्दीत प्रवास करतात, लोकल ट्रेनच्या डब्यांना दरवाजे नसल्याने अपघात होतात, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे लोकल रेल्वेमधील सुधारणेसाठी मागणी केली आहे. रेल्वेला मेट्रोसारखे एसी कोचेस मिळावेत. एसी कोचेसना बंद होणार दरवाजे असावेत. यामुळे तिकीटदरात एका रुपयाचीही वाढ होऊ नये अशी मागणी आम्ही केली आहे. याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाईल, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.
लवकरच मुंबईतील लोकल रेल्वेचे डबे मेट्रोसारखे वातानुकूलित असतील हे डबे रेट्रोफिटिंग नसून नवे डबे असतील. उत्कृष्ट पद्धतीचे हे डबे, कोचेस असतील. आगामी काळात लोकल ट्रेनला बंद होणारे दरवाजे असतील. पण तिकिटात कोणत्याही प्रकारची दरवाढ होणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. याशिवाय त्यांनी मेट्रो प्रकल्पांवरही भाष्य केले आहे. कुलाबा ते आरे मार्ग ऑक्टोबर २०२५ च्या अखेरीस पूर्णतः कार्यान्वित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विक्रोळी-मंडाले आणि ठाणे-कल्याणसह १३ मेट्रो मार्गांवर काम वेगाने सुरू आहे. एकात्मिक तिकीट प्रणालीही लवकरच लागू होणार आहे. या प्रणालीमुळे एकाच तिकीटावर मेट्रो, लोकल, मोनो, बेस्ट आणि जलवाहतूक या सर्व सेवा वापरता येणार आहेत. हे तिकीट व्हॉट्सअॅपवरही उपलब्ध होणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.