‘प्रवीण गायकवाड धक्काबुक्की प्रकरणी दोघे ताब्यात’; अटकेची तरतूद नाही, माेठे अपडेट आले समाेर….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सोलापूर :- “संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला शाई फासून धक्काबुक्की करणाऱ्या शिवधर्म फाउंडेशनच्या सात जणांविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्यातील कलमांनुसार संशयितांना अटक होऊ शकत नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गुन्ह्यातील सातपैकी दीपक काटे व भवानेश्वर शिरगिरे (दोघेही रा. इंदापूर) हे दोघे पोलिसांच्या ताब्यात आहेत. उद्या (मंगळवारी) त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी अपर पोलिस अधीक्षकांसमोर हजर केले जाणार आहे. उर्वरित पाच संशयितांचा शोध सुरू आहे.
अक्कलकोटमध्ये झालेल्या या प्रकरणात पोलिस वेळेवर घटनास्थळी पोचले आणि गायकवाड यांच्यावर शाई टाकणाऱ्यांना बाजूला केले; अन्यथा काहीतरी अनुचित प्रकार घडला असता, असे पोलिस अधिकारी सांगतात. दरम्यान, गायकवाड यांच्या शरीरावर इजा किंवा जखम झाली असती तर कलमांमध्ये वाढ झाली असती, असेही पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, सकल मराठा समाजाच्या वतीने पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले आहे. संशयित आरोपींविरुद्ध खुनी हल्ल्याचे कलम लावावे, अशी त्यांची मागणी आहे. संशयितांविरुद्ध ते कलम न लावल्यास आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी निवेदनातून दिला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…
अध्यक्ष महोदय, मी स्वत: या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. वस्तुस्थिती आहे की आरोपींनी अशाप्रकारे हल्ला केला. तुम्ही संभाजी नाव ठेवले आणि छत्रपती संभाजी असे नाव का नाही ठेवले, असा वाद तयार करून त्यांच्यावर शाई फेकली. पोलिस तातडीने त्या ठिकाणी पोचले. पोलिसांनी गायकवाड यांना विनंती केली, तरी ते फिर्याद द्यायला तयार नव्हते. तरी, पोलिसांनी फिर्याद घेतली. फिर्याद घेऊन त्या ठिकाणी पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक केली आहे. अद्यापही आरोपी पोलिसांच्याच ताब्यात आहेत. पोलिसांनी त्यांना सोडलेले नाही. त्या ठिकाणी जी काही घटना घडलेली आहे, त्यानुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्यासंदर्भात जी काही कलमे लावावी लागतात ती कलमे लावून यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पोलिस अधिकारी म्हणतात…
प्रवीण गायकवाड यांना शाई फासून धक्काबुक्की करणाऱ्यांपैकी दोघांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११५ (२), १८९ (२), १९१ (२), १९० व ३२४(४) नुसार गुन्हा दाखल दाखल झाला आहे. संशयितांविरुद्ध दाखल गुन्ह्यातील कलमांनुसार सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना अटक करता येत नाही. त्यांना नोटीस देण्यात आली असून, घटनास्थळावरून पकडलेले दोघे पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असून, मंगळवारी (ता. १४) त्या दोघांना अपर पोलिस अधीक्षकांसमोर उभे करून त्यांच्याकडून चांगल्या वर्तनाचे बंधपत्र घेण्यात येणार आहे. उर्वरित पाच जणांना शोधून त्यांच्यावरही अशीच कारवाई केली जाईल.