जयंत पाटील भाजपच्या वाटेवर..? पडद्यामागे जोरदार हालचालींची चर्चा….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं. त्यामुळे आगामी काळात काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आगामी काळात भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
या चर्चांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे पडद्यामागे तशा घडामोडी घडत आहेत. ‘एबीपी माझा’ने सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त दिलं आहे. जयंत पाटील आणि भाजप यांच्यात एकमत झालं आणि पक्षप्रवेशाचं निश्चित झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणातला हा नवा भूकंप मानला जाणार आहे. जयंत पाटील हे खरंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अतिशय विश्वासू आणि जवळचे सहकारी आहेत. ते अनेक वर्षांपासून शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
जयंत पाटील भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण येण्याचं टायमिंग देखील महत्त्वाचं आहे. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. त्यांच्या राजीनाम्याची काल चांगलीच चर्चा होती. पण त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड आणि नंतर खासदार सुप्रीया सुळे यांनी वृत्ताचं खंडन केलं. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. पण तरीसुद्धा दुसऱ्या बाजूला जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे सर्वकाही ठरलं आहे. आता केवळ टॉपच्या खात्याचं मंत्रिपद मिळालं तर जयंत पाटील हे भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. असं असलं तरी हे सगळं भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर अवलंबून असल्याची देखील माहिती आहे.
आतापर्यंत पडद्यामागे काय काय घडलं?
सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, जयंत पाटील यांची भाजप प्रवेशासाठी राज्यातील भाजप नेतृत्वाशी दोनवेळा चर्चा झाल्याची माहिती आहे. जयंत पाटील यांना राज्य मंत्रिमंडळातील टॉपच्या पाच पैकी एक खातं हवं आहे. पण सध्याच्या स्थितीत तसं खातं देणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी कठीण आहे. त्यामुळे जयंत पाटील यांचा भाजप प्रवेश रखडल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे भाजपमधील काही मंडळींचा जयंत पाटील यांच्या प्रवेशाला विरोध असल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाला कधी मुहूर्त मिळेल? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
जयंत पाटील यांनी याआधी अर्थ, गृह, ग्रामविकास आणि जलसंपदा खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे जयंत पाटील यांना अशाच प्रकारचं टॉपचं खातं भाजपला द्यावं लागेल. पण सध्याच्या स्थितीत तीन मोठ्या पक्षांचं सरकार आहे. यापैकी अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. तर गृह स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे टॉपच्या 5 खात्यांपैकी एक खातं जयंत पाटील यांना देणं भाजपला कठीण होणार आहे. यामुळे जयंत पाटील यांचा पक्षप्रवेश रखडल्याची चर्चा आहे. आगामी काळात भाजपला जयंत पाटील यांची मनधरणी करण्यात यश मिळतं का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.