आता लढा निर्णायक टप्प्यावर ; बच्चू कडू : अंबोडा येथे सातबारा कोरा पदयात्रेचा समारोप….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अंबोडा :- “शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय मागे हटायचे नाही, असा इशारा माजी आमदार बच्चू कडू यांनी दिला.
ते सोमवारी (ता. १४) अंबोडा (ता.महागाव) येथे सातबारा कोरा पदयात्रेच्या समारोप करताना बोलत होते. यावेळी आमदार रोहित पाटील उपस्थित होते. पुढे बोलताना कडू म्हणाले, पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या गावापासून निघालेल्या यात्रेने १४२ किलोमीटरचा संघर्षमय प्रवास पार केला.
पदयात्रेच्या निमित्ताने हजारो शेतकरी आणि शेतमजूर एकत्र आले. जात, धर्म, पंथ विसरून सर्वांनी एकसंघ होऊन आता ‘आम्ही शेतकरी आहोत’ या एका ओळखीवर एकवटले आहे. ही एकजूट कायम ठेवत सरकारला सातबारा कोरा करण्यासाठी भाग पाडणार असल्याचेही कडू म्हणाले.
अंबोडा येथील ही सभा निर्णायक ठरली आहे. या सभेतून शेतकऱ्यांचा हुंकार, सरकारच्या कानावर गेला आहे. शेतकऱ्यांना आजच्या स्थितीतून वाचायचे असेल तर एकत्र आल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगून शासनाच्या धोरणावर जोरदार टीका माजी आमदार कडू यांनी केली.
२४ जुलैला चक्काजामचा इशारा
राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकार आंधळ्याचे सोंग घेत असल्याचा आरोप करून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २४ जुलैला महाराष्ट्र बंद व चक्काजाम आंदोलनाचा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
नागपूर-कोल्हापूर राज्य महामार्गावर जाम
शेकडो ट्रॅक्टर घेऊन शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. काहींनी लाठ्या-काठ्या, रुमणे घेऊन शासनाच्या लुटीचा हिशेब मागण्यासाठी मैदानात प्रवेश केला. शेतकऱ्यांच्या डोळ्यातली आग आणि रस्त्यावरचा रणसंग्राम या निमित्ताने दिसून आला.
अंबोडा येथील आंदोलन यशस्वी करण्याकरिता या आंदोलनात करिता अंबोडा येथे दोन नियोजन बैठक घेण्यात आल्या होत्या या बैठकीमध्ये आंदोलनाची तयारी करण्यात आली आंदोलन अंबोडा येथे यशस्वी करण्याकरिता गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष हनवंतराव देशमुख अमृतराव देशमुख मनीष जाधव सह अनेकांनी सहकार्य केले.
हे आंदोलन आता थांबणार नाही, हे आंदोलन फक्त मागणीसाठी नाही, तर हे स्वाभिमानासाठी आहे. ‘सातबारा कोरा’ ही घोषणा उरलेली नाही, ती जनतेची आणि शेतकऱ्यांची मागणी आहे. या लढ्याला आमचा पाठिंबा असून शेतकरी आता पेटून उठला आहे. आता सरकारनेही जागे व्हायला हवे. :- रोहित पाटील,
आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार.