१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; भाजपाचा शिवाजी पार्कवर जल्लोष….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन मिळाल्याबद्दलचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबई भाजपातर्फे उद्या मुंबईत १०६ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती व शिव जल्लोष साजरा करण्यात येणार आहे.
तर आज, शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर जल्लोष करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेले गड-किल्ले म्हणजे केवळ वास्तू नव्हे, तर हिंदवी स्वराज्याची शौर्यगाथा सांगणारे साक्षीदारच! अशा या १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळाल्याने आज महाराष्ट्राला जागतिक स्तरावर ऐतिहासिक वैभव प्राप्त झाले आहे. या ऐतिहासिक क्षणानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे मुंबई भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपा अध्यक्ष तथा राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, विनम्र अभिवादन केले. ढोल ताशांचा गजरात जय शिवराय जय भवानीचा जयघोष करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण दादर परिसर दुमदुमून गेला होता.
शिवरायांच्या अद्वितीय नेतृत्वाची आणि दूरदृष्टीची ही जागतिक स्तरावर झालेली ओळख, प्रत्येक शिवप्रेमी आणि महाराष्ट्राच्या नागरिकासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. यावेळी ढोल ताशांच्या गजरात, महाराजांच्या जयघोषात आणि जल्लोषात संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसर अगदी शिवमय झाले होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री पियुष गोयल , मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार संजय उपाध्याय, आमदार योगेश सागर, आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रविण दरेकर, आमदार कॅप्टन आर तमिल सेल्वन, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, उद्या मुंबईत १०६ ठिकाणी अशाच प्रकारे जल्लोष साजरा करण्यात येणार आहे.