श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाची नोटीस ; शिवसेनेच्या आणखी एका मंत्र्याला झटका…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी हाती येत असून शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाने नोटीस धाडली आहे. त्यांच्यासह मंत्री संजय शिरसाट यांनाही नोटीस मिळाली आहे.
शिरसाट यांच्या संपत्तीवरुन मागच्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु होते.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या उत्पन्नात झालेल्या वाढीमुळे त्यांना नोटीस बजावण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. छत्रपती संभाजी नगर येथील व्हिट्स हॉटेल प्रकरण सिरसाट यांच्या अंगलट आल्याची येण्याची शक्यता आहे. याच हॉटेलच्या खरेदी व्यवहारावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आवाज उठवला होता.
आरोप झाल्यानंतर या टेंडर प्रक्रियेतून आम्ही माघार घेतो, असं संजय शिरसाट म्हणाले होते. याबाबत आता आयकर विभागाकडे तक्रार गेल्याची माहिती आहे. त्यावरुन मंत्री शिरसाट यांना नोटीस धाडण्यात आलेली आहे. संजय शिरसाट यांनी यावरन आपली बाजू मांडली आहे.
शिरसाट म्हणाले की, आयकर विभाग आपलं काम करीत आहे. त्यात काही चुकीचं नाही. २०१९ ते २०२४ या काळात मालमत्तेमध्ये झालेल्या वाढीचं उत्तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने मागवलं आहे. त्या नोटिशीला मी उत्तर देणार आहे, असं शिरसाट म्हणाले.
संजय शिरसाट यांनी उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागवून घेतला आहे. आयकर विभागाला नेमकं कसं उत्तर हवंय, याबाबत स्पष्टता नसल्याने त्यांनी वेळ मागवून घेतला होता. आम्ही कायदेशीररित्या उत्तर देऊ असं शिरसाट यांनी सांगितलं. यंत्रणांना व्यवहारामध्ये तफावत आढळली तर ते त्यांचं काम करत असतात. मी कुणाच्याही रडावर नाही, एवढं गांभीर्याने घेण्याजोगा हा विषय नाही, असंही ते म्हणाले.
दुसरीकडे एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना नोटीस आलेली आहे. ती कोणत्या प्रकरणात आहे आणि त्यावर ते कधीपर्यंत उत्तर दाखल करणार आहेत, याबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र शिवसेनेच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांना नोटीस आल्याने पडद्यामागे नेमकं सुरुय तरी काय? भाजप काही कुरापती करतंय का? असं प्रश्न उपस्थित होत आहेत.