विदर्भात पावसाचा कहर: नागपूर विभागात ७ बळी, आज पुन्हा ५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “नागपूरसह संपूर्ण विदर्भाला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, पूरस्थिती आणि पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो घरांचे नुकसान झाले असून, रस्ते, पाणीपुरवठा आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
हवामान खात्याने नागपूर विभागातील पाच जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केल्याने परिस्थितीचे गांभीर्य वाढले आहे.
पावसाने उसंत घेतली असली तरी, पुराचे पाणी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांनी विदर्भातील जनजीवन वेठीस धरले आहे. मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असले तरी, परिस्थिती पूर्वपदावर येण्यास आणखी काही काळ लागणार असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने लष्कराला पाचारण केले असून, संपूर्ण यंत्रणा हाय अलर्टवर आहे.
मदत व बचाव कार्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी गडचिरोली आणि नागपूर येथे 2 हेलिकॉप्टरसह भारतीय सैन्य दलाची चमू सज्ज झाला आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्याने येथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफची चमू सज्ज ठेवण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मदत व बचाव कार्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली.
नागपूर, वर्धाला आज पुन्हा ऑरेंज अलर्ट
नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीला आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पाच ही जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर अमरावती, यवतमाळ, वाशीम, अकोला, बुलढाणा जिल्ह्याला पावसाचा एलो अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेने भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्राम्हपुरी तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावू शकते
नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीला पुर आल्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. नागपूरातील ३३ जलकुंभातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याला फटका बसला आहे. कन्हान नदीतील इनटेक विहिरीत गाळ, वाळू आणि कचरा साचल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे नागपूरकरांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावू शकते. दरम्यान ओसीडब्लूकडून गाळ, वाळू आणि कचरा काढण्याचे काम सुरु आहे.
एसटीच्या 22 मार्गावरील 416 फेऱ्या रद्द
बुधवारच्या अतिवृष्टीचा एसटीलाही फटका बसला असून, नागपूर विभागातील एसटीच्या 416 फेऱ्या बुधवारी रद्द करण्यात आल्या. 22 मार्गावरील 416 फेऱ्या रद्द करण्यात केल्यामुळे नागपूर विभागाला एकाच दिवसात 7 लाख 26 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे नागपूर विभागात एसटीच्या बसेस 21 हजार 280 किलोमीटर धाऊ शकल्या नाहीत. पावसाच्या पाण्यामुळे रस्ते जलमय झाले होते, नदी- नाल्यांचे पाणी पुलावर आल्याने अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. ज्यामुळे एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
शाळेच्या परिसरात अजूनही साचलेले पाणी
बेलतरोडी भागात शाळेच्या परिसरात अजूनंही पाणी साचलंय. शाळेच्या आवारात पाणी साचल्याने शाळा आजही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेलतरोडी येथील एसओएस शाळेत काल मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. आज दुसऱ्या दिवशीही शाळेच्या आवारात पाणी साचलं आहे. शाळेच्या मुख्य गेटवर पाणी साचले आहे. शाळेत सुमारे 1500 विद्यार्थी शिकतात, आज शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.