‘त्यांना संविधान खुपते, म्हणून…’, RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(RSS) नेते दत्तात्रय होसाबळे यांनी संविधानातून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ हे शब्द काढून टाकण्याबाबतचे वक्तव्य केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
यावरुन आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला.
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘पुन्हा एकदा आरएसएसचा मुखवटा उतरला. त्यांना संविधान खुपते, कारण त्यात समानता, धर्मनिरपेक्षता आणि न्यायाचा उल्लेख आहे. भाजप-आरएसएसला संविधान नको, मनुस्मृती हवी आहे.”
“बहुजन आणि गरीबांचे हक्क हिसकावून त्यांना पुन्हा गुलाम बनवायचे आहे. त्यांचा खरा अजेंडा संविधानासारखे शक्तिशाली शस्त्र हिसकावून घेणे आहे. आरएसएसने हे स्वप्न पाहणे थांबवावे. आम्ही त्यांना कधीही यशस्वी होऊ देणार नाही. प्रत्येक देशभक्त भारतीय शेवटच्या श्वासापर्यंत संविधानाचे रक्षण करेल,” अशी टीका राहुल गांधींनी केली.
काय म्हणाले दत्तात्रय होसबळे?
आरएसएस नेते दत्तात्रय होसाबळे यांनी गुरुवारी (२७ जून २०२५) एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, “आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवाद-धर्मनिरपेक्षता हे शब्द जोडले गेले. हे शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानाच्या प्रस्तावनेत कधीच नव्हते. ज्यावेळी मूलभूत अधिकार काढून घेतले होते, संसद काम करत नव्हती, न्यायव्यवस्था लकवाग्रस्त होती, त्या आणीबाणीच्या काळात हे शब्द जोडले गेले. या मुद्द्यावर नंतर चर्चा झाली, परंतु ते प्रस्तावनेतून काढून टाकण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही. हे शब्द प्रस्तावनेत राहावेत की, नाही याचा विचार केला पाहिजे.”