काँग्रेसचा भाजपाला छुपा पाठिंबा? लवकरच तिसरी आघाडी..? माजी मुख्यमंत्र्यांनी काय आरोप केले..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “इंडिया आघाडीतील काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आतिषी यांनी आरोप केलाय की, केंद्रातील भाजपा सरकारला काँग्रेसचा छुपा पाठिंबा आहे. एकीकडे भाजपाकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांचा छळ केला जात आहे, तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांवर कोणतीही कारवाई होत नाहीये.
ही बाब खरोखरच विचार करण्यासारखी असून काँग्रेसच्या नेत्यांना तुरुंगात का पाठविण्यात येत नाही? असा प्रश्न दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस व भाजपाशिवाय विरोधात असलेल्या इतर पक्षांनी तिसऱ्या आघाडीचा विचार नक्कीच करायला हवा, असंही आतिषी यांनी म्हटलं आहे.
इंडिया आघाडीपासून ‘आप’चा दुरावा?
दोन दिवसांपूर्वीच इंडिया आघाडीच्या नेत्यांची राजधानी दिल्लीत एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्यावर सहमती झाली. या पत्रावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, द्रमुक, झारखंड मुक्ती मोर्चा, नॅशनल कॉन्फरन्स पार्टी, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि डाव्या पक्षांसह एकूण १६ पक्षांच्या नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. विशेष बाब म्हणजे, नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात भूमिका घेणाऱ्या आम आदमी पार्टीच्या एकही नेत्याची या बैठकीला उपस्थिती नव्हती. ‘आप’ने संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यासाठी पंतप्रधानांना स्वतंत्र पत्र लिहिण्याची भूमिका घेतली होती.
“काँग्रेसची भूमिका अत्यंत निराशाजनक”
आम आदमी पार्टीच्या नेत्या व दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी शनिवारी (तारीख ५ जून) ‘दी इंडियन एक्सप्रेस’ला मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या की, काँग्रेस हा इंडिया आघाडीतील सर्वात मोठा घटकपक्ष आहे. त्यामुळे विरोधीपक्षातील सर्व नेत्यांना एकत्र करण्याची त्यांची जबाबदारी होती. जसं मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीने सर्वांना बरोबर घेणं अपेक्षित असतं, तसं काँग्रेसकडूनही तीच अपेक्षा होती. पण त्यांनी निराशाजनक कामगिरी केली आहे, अशी टीका आतिषी यांनी केली.
“विरोधकांनी तिसऱ्या आघाडीचा विचार करावा”
तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना आतिशी म्हणाल्या, “माझ्या मते, काँग्रेस-भाजपा विरहित पक्षांनी देशात काय घडतेय याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांच्या नेत्यांचा होणारा छळ पाहता, तिसऱ्या आघाडीचा विचार करणे आवश्यक आहे.” यावेळी आतिशी यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करत असं म्हटलंय की, काँग्रेस भाजपाला गुप्त पाठिंबा देत आहेत. त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या केरळ दौऱ्यात पिनाराई विजयन यांच्यावर केलेल्या टीकेचा संदर्भ देत म्हटले की, काँग्रेस-भाजपाची भाषा बोलत आहे.
“काँग्रेसच्या नेत्यांना तुरुंगात का टाकलं जात नाही?”
“दिल्लीच्या मद्यधोरण प्रकरणात आमच्या नेत्यांकडे कोणतेही पैसे सापडले नाहीत, त्यांच्याविरोधात कोणताही पुरावा नव्हता, तरीही सर्वजण तुरुंगात गेले. पण ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात काँग्रेसचा एकही नेता जेलमध्ये का गेला नाही?” असा प्रश्नही आतिशी यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसशी संबंधित इतर प्रकरणांचाही उल्लेख केला. डीएलएफ जमीन घोटाळा प्रकरणी प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची ईडीने चौकशी केली होती, ते तुरुंगात का गेले नाही? कॉमनवेल्थ गेम्स प्रकरण तर पूर्णपणे बंदच झाले आहे, याची आठवणही आतिशी यांनी करून दिली.
दिल्लीत काँग्रेस-‘आप’मध्ये राजकीय संघर्ष
दिल्लीच्या विरोधीपक्षनेत्या असलेल्या आतिशी म्हणाल्या, “विरोधीपक्षांमधील जे नेते भाजपात सामील होतात, त्यांच्यावरील खटले बंद केले जातात. हाच प्रकार काँग्रेसबाबतही घडतो आहे. हे काय सूचित करतं? ‘आप’चे नेते तुरुंगात जातात, तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी, सीपीएमचे पिनाराई विजयन आणि त्यांच्या मुलीवर खटले दाखल होतात, मग काँग्रेसच्या बाबतीत हे का घडत नाही? काँग्रेसचे नेते तुरुंगात का जात नाहीत? यावरून स्पष्ट होते की काँग्रेस व भाजपमध्ये एक अघोषित युती आहे.” दरम्यान, आतिशी यांच्या या आरोपांमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. काँग्रेसचे नेते त्यांच्या आरोपांवर नेमके काय उत्तर देतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

बच्चू कडू हे गुवाहाटीला केवळ पैशासाठीच गेले. भाजपच्या जवळच्या व्यक्तीनेच केली शिंदेंच्या बंडाची पोलखोल…..
ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….