पडद्यामागं नेमकं काय घडतंय? जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत भेट झाली आहे.
मागील एका महिन्यातील या दोन्ही महत्वाच्या नेत्यांची ही दुसरी भेट आहे. रात्री उशिरा मुंबईत ही भेट झाल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, एका बाजुला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या चर्या सुरु आहेत. अशातच आता दुसऱ्या बाजुला महायुतीतील महत्वाच्या पक्षाच्या प्रमुखाची आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या राज्याच्या प्रमुखांची भेट झाल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत.
गेल्या काही दिवसातील जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील ही दुसरी भेट आहे. 24 फेब्रुवारीला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सरकारी निवासस्थानी रात्री 8 वाजता जयंत पाटील यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याचा अंदाज वर्तवला जात होता. दरम्यान, या भेटीवेळी मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित असल्याचं बोललं जात होतं. दरम्यान, याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांना जेव्हा या भेटीबाबत विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, ‘जयंत पाटील सांगली जिल्हा आणि त्यांच्या जिल्ह्यातील महसुली खात्याशी संबंधित काही विषयाला घेऊन भेट घेण्यासाठी आले होते. विखे-पाटीलही सोबत होते. 14 ते 15 विषय महसूल विभागाशी संबंधित असल्यानं भेट झाल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली होती. सांगली जिल्ह्याच्या विकास कामाबद्दल त्यांनी चर्चा केली. त्यांना मी आश्वासन दिले येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या 14 समस्या संदर्भात बैठक माझ्या दालनात लावून सोडवणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.