ठरलं..! धनंजय मुंडेंचं खातं छगन भुजबळांच्या पारड्यात; अन्न, नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी राजभवनमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांना स्थान देण्यात आले. छगन भुजबळ यांना पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता याबाबत शासकीय आदेश काढण्यात आला असून मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचा पदभार सोपवण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असतानाही छगन भुजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेकवेळा व्यक्त केली असून, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही थेट टीका केली होती. अजित पवारांनी मंत्रिमंडळात डावलल्यानंतर छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्या वेळी फडणवीसांनी त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला होता. मागील सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. मात्र नंतर हे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आले होते. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार यांच्याकडे या खात्याचा चार्ज होता. आता अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
ताबडतोब खात्याचा चार्ज घेणार : छगन भुजबळ
याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. मला आत्ताच कळलं की, नोटिफिकेशन निघालं आहे. मी आत्ताच मुंबईला जातो आहे आणि ताबडतोब चार्ज पण घेतो आहे. आमचे मुख्य अधिकारी, सचिव या सगळ्यांची बैठक देखील घेत आहे. त्यांचे काय प्रश्न आहेत? यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
हे माझंच खात होतं : छगन भुजबळ
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, माझा प्राधान्यक्रम हाच आहे की माझ्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभाग आहे. कोरोना काळातही दोन वर्ष ज्यावेळी सगळे लोक घरात बसले होते, त्यावेळी मी शेवटच्या गावापर्यंत प्रत्येक दुकानात अन्य धान्य पोहोचवलं, कुठेही तक्रार येऊ दिली नाही. रात्रंदिवस आमच्या विभागाने काम केलं, आता सुद्धा आमचं हेच ध्येय आहे की, एक तर पुढे घोटाळा होता कामा नये. दुसरं संपूर्ण गोरगरिबांना चांगल्या प्रतीचे अन्नधान्य मिळावं. जिथे कुठे राज्यात मागास भटके असतील, त्यांना रेशन कार्ड तात्काळ पुरवणे आणि धान्य वाटप करणार आहे. शिवभोजनच्या काही तक्रारी असतील, तर त्या सोडवाव्या लागतील. हे माझंच खात होतं, माझा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने ते धनंजय मुंडे यांच्याकडे गेलं, आता धनंजय मुंडे यांना लांब राहावे लागले. आता पुन्हा माझ्याकडे हे खातं आलं, असे त्यांनी म्हटले.