शरद पवारांच्या ‘त्या’ इशाऱ्यावर भाजप मंत्र्याची मोठी प्रतिक्रिया, सर्वांच्या भुवया उंचावल्या….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “दिल्ली येथे झालेल्या बैठकीदरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘एका पराभवाने खचणारी आम्ही माणसे नाहीत’ असा इशारा सत्ताधाऱ्यांना दिला. पवार यांच्या या इशाऱ्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा दावा केला आहे.
ज्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत.
२०४७ पर्यंत आता शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला काही वाव नाही. असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं आहे. शरद पवार यांनी दिल्लीत केलेल्या विधानावर बोलताना बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. यावेळी, ‘काँग्रेस आणि महाविकास आघाडीने आता २०४७ पर्यंत वाट पाहावी. २०४७ पर्यंत त्यांनी आपापल्या पक्षात चांगले काम करावे. मी त्यांना विरोधी पक्षात काम करण्याच्या शुभेच्छा देतो,’ असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले बावनकुळे?
विकसित भारताचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. विकसित भारताला साथ देण्याकरिता संपूर्ण देश पंतप्रधान मोदी यांच्यासोबत उभा आहे. विकसित महाराष्ट्राचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्रातील १४ कोटींची जनता देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभी आहे. महायुतीच्या सोबत आहे.
त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीने आता २०४७ पर्यंत वाट पाहावी. २०४७ पर्यंत त्यांनी आपापल्या पक्षात चांगले काम करावे. मी त्यांना विरोधी पक्षात काम करण्याच्या शुभेच्छा देतो, असं बावनकुळे यावेळी म्हणाले आहेत.
शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?
दिल्ली येथे गुरुवारी (दि.27 ) गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीत पहिल्यांदाच पक्षाची दिल्लीत बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये राज्यात घडणाऱ्या घडामोडींवर म्हणजे औरंगजेबाच्या कबरीवरून सुरु असलेला वाद ते कॉमेडीयन कुणाल कामराविरोधातील वाद अशा अनेक मुद्यांवर बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
देशातील राजकीय परिस्थिती पाहता खंबीर वैचारिक लढा देण्याची हीच वेळ असल्याचे शरद पवारांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितलं. तसेच, विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. पण, एका पराभवाने खचून जाणारी आम्ही माणसे नाहीत, असे पवार यांनी कार्यकर्त्यांना नव्या उमेदीने लढण्याचा संदेश दिला.