पालकमंत्रिपदावरून युतीत दरी, रायगडवरून कलगीतुरा; शिंदेसेना, अजित पवार गटालाही हवे नाशिक…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्यानंतरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या दरे (जि. सातारा) या मूळगावी गेले ते रात्री उशिरा परतले.
पण, महायुतीत पालकमंत्रिपदांवरून दरी निर्माण झाल्याचे चित्र सोमवारी समोर आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोसमध्ये असून ते परतल्यानंतर हा वाद शमेल, अशी शक्यता आहे.
रायगडचे पालकमंत्रिपद शिदेसेनेला हवे असतानाही मुख्यमंत्र्यांनी ते अजित पवार गटाला (अदिती तटकरे) दिल्याने एकीकडे रायगड जिल्ह्यातील शिंदे सेना आक्रमक झाली असताना दुसरीकडे शिंदेही यावरून नाराज असल्याची चर्चा आहे. तर नाशिकच्या पालकमंत्रिपदावर शिंदेसेना आणि अजित पवार गटाने दावा सांगितला असताना ते भाजपचे गिरीश महाजन यांच्याकडे गेल्याने दोन्हींमध्ये नाराजीचा सूर आहे.
रायगडवरून शिंदेसेना आणि अजित पवार गटात सोमवारी कलगीतुरा बघायला मिळाला. आम्ही अदिती तटकरे यांना पालकमंत्री म्हणून स्वीकारणार नाही असे शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे म्हणाले.
‘स्थगित’ मंत्रीच ध्वजारोहण करणार
रायगड व नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली असली तरी दोन्ही जिल्ह्यांत स्थगिती दिलेले पालकमंत्रीच ध्वजारोहण करणार आहेत.
तिघे मिळून चर्चा करु, लवकरच निर्णय घेऊ
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत भरत गोगावले यांनी अपेक्षा करण्यात वावगे काय आहे? त्यांनी अनेक वर्ष रायगडमध्ये काम केले आहे. त्यामुळे मागणी करणे चुकीचे नाही. मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बसून लवकरच निर्णय करू. नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबरोबरच मला इथले इतर प्रकल्प मार्गी लावायचे आहेत, त्यामुळे मला एकदा काय अनेकदा गावी यावेच लागते. – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
जनतेच्या मनातील मीच पालकमंत्री : मुश्रीफ
कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदावरूनही खदखद सुरू झाली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्रिपद शिंदेसेनेचे प्रकाश आबिटकर यांना मिळाल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ नाराज झाले आहेत. सोमवारी पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातून गेली वीस वर्षे मी मंत्रिपदावर आहे.
त्यापैकी केवळ १४ महिनेच मला या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले. जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच आहे. आमच्याकडे श्रद्धा -सबुरी आणि नेत्यावरील निष्ठा आहे. याबाबतच्या माझ्या भावना पक्षनेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे व्यक्त केल्या आहेत.
चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले कारण
भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पालकमंत्रिपदावरून महायुती सरकारमध्ये कोणतेही वाद नाहीत, काही कुरबुरी असतील तर त्यावर चर्चेतून मार्ग निघेल. ठाण्यापासून संपूर्ण कोकणच्या पट्ट्यात अजित पवार गटाला कुठेच पालकमंत्रिपद मिळाले नव्हते.
त्यामुळे त्यांच्याकडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच, नाशिक येथे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्रिपद दिले आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी साेमवारी सांगितले.
मी बीडची मुलगी, मला संधी मिळाली असती तर…
मी बीडची मुलगी आहे, जर मला बीडचे पालकमंत्रिपद मिळाले असते तर बीडची सेवा करण्याची संधी मला मिळाली असती, यामुळे अजून आनंद झाला असता, असे सांगत पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. त्यांना जालन्याचे पालकमंत्री केले आहे. त्या म्हणाल्या, मला जालन्यासोबतच बीडवर डबल लक्ष द्यावे लागेल.
राज्यात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर गेले आहेत, वाद उद्भवणे योग्य नाही. वादावर मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा होईल.
– खा.सुनील तटकरे,
प्रदेशाध्यक्ष अजित पवार गट
रायगडचे पालकमंत्री गोगावले होणार असे वातावरण होते. जे झाले ते मनाला पटणारे नव्हते. आता आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. – भरत गोगावले, रो. ह. योजना मंत्री
आमच्या पक्षाचे नाशिक जिल्ह्यात सात आमदार आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपद आमच्याच पक्षाला मिळायला हवे.
– माणिकराव कोकाटे, कृषीमंत्री