सुषमा अंधारे, विनायक राऊतांवर गंभीर आरोप; बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्य संघटक एकनाथ पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. पवार यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार मतदारसंघातून पक्षाकडून निवडणूक लढवली होती.
मी घेतलेला निर्णय अचानक नाही. मला तिकिट मिळू नये यासाठी माझ्या पक्षातील लोकांनीच कट कारस्थान केले. मागच्या १५ दिवसांपूर्वी संजय राऊत, सचिन अहिर यांची भेट घेतली. मी त्यांना सगळं सांगितले. कदाचित उद्धव ठाकरे कामात व्यस्त असतील त्यामुळे त्यांनी मला भेटण्याची वेळ दिली नाही असं सांगत एकनाथ पवार यांनी विनायक राऊत, सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत.
एकनाथ पवार म्हणाले की, नांदेड जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी प्रचंड स्कोप असताना अनेक दलाल मंडळी उद्धव ठाकरेंना फसवतायेत. पुढच्या काळात अशा मंडळींसोबत मी काम करू शकत नाही. एका माणसासाठी पक्षाच्या १५ पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरणे योग्य नाही. मी महापालिकेची निवडणूक लढणार नाही. लोहा कंधार मतदारसंघातील जनतेसाठी माझं आयुष्य समर्पित केले आहे. महापालिकेचं तिकिट मला मिळावं ही मला अपेक्षा नाही. पुढच्या काळात काय काय घडेल, राजकीय भूमिका काय असेल हे सांगू असं त्यांनी म्हटलं.
तसेच नांदेडचे जिल्हा संपर्क प्रमुख बबन थोरात, विनायक राऊत, सुषमा अंधारे यासारखे लोक मातोश्रीच्या अवतीभोवती राहून पक्षाचे तिकिट विकतायेत. नांदेड जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी प्रचंड स्कोप असताना इतर पक्षातील अनेक पदाधिकारी माझ्या निवडणुकीपूर्वी पक्षात येत असताना या दलाल मंडळींनी त्यांना पक्षात घेतले नाही. ज्यापद्धतीने २० तारखेला मतदान झाले आणि २३ तारखेच्या निर्णयानंतर मी जे सहन करतोय. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षप्रमुख आणि संजय राऊत यांनी दीड वर्षापूर्वी जे सांगितले, त्यांनासुद्धा विश्वासात न घेता दुसरा उमेदवार उभा करण्यासाठी माझ्याविरोधात कारस्थान रचले. मला १२ वाजता एबी फॉर्म दिला गेला. हे दोघे तिघे दलाल आहेत जे पक्षाचे मराठवाड्यात नुकसान करतायेत. नांदेड जिल्ह्यात एकमेव जागा लढत असताना पक्षाची जबाबदारी असते १० पदाधिकारी तिथे येऊन बसणे, परंतु माझ्या निवडणुकीत मी पराभूत कसा होईल यासाठी बबन थोरात, विनायक राऊत यांच्यासारखी माणसं काम करत होती असा आरोप एकनाथ पवार यांनी केला.
कोण आहेत एकनाथ पवार?
एकनाथ पवार हे शिवसेना ठाकरे गटात महाराष्ट्र राज्य संघटक म्हणून काम करतात. २०१७ ते २०२२ या काळात ते भाजपाचे पिंपरी चिंचवड महापालिकेत सभागृह नेते होते. काही काळ शहराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर २२ ऑक्टोबर २०२३ ला एकनाथ पवार यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत असल्याचं सांगितले. त्यानंतर ३ दिवसांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेत पक्ष करत मराठवाड्यातून लोहा कंधार मतदारसंघात लढण्याची तयारी केली.