गुणरत्न सदावर्तेंच्या संचालकांनी केला 150 कोटींचा घोटाळा, बायकोच्या खात्यात 43 लाख वळवल्याचा आरोप….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “डंके की चोट पर म्हणत अँड. गुणरत्न सदावर्ते यांनी आजपर्यंत सरकारविरोधात जाणाऱ्यांना अंगावर घेतलं. आता मात्र गुणरत्न सदावर्ते यांच्यावरच गंभीर आरोप करण्यात आले आहे.
एसटी कामगारांच्या सहकारी बँकेत अँड. गुणरत्न सदावर्ते यांच्या संचालक मंडळाने आजवर 100-150 कोटींचा अपहार केल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी केला आहे. तसंत, त्यांच्या पत्नीच्या खात्यातही 43 लाख रुपये जमा केल्याचा आरोपही केला.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अँड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री सदावर्ते यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सदावर्ते यांच्या संचालकांनी एसटी बँकेत 150 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.
नोकरभरती आणि बोनस घोटाळ्यातील 43 लाखांची रोख रक्कम संचालकांनी सदावर्ते यांची पत्नी जयश्री यांच्या बँक खात्यावर पाठवले, असा आरोपच शिंदे यांनी केला. याबद्दल त्यांनी आरटीजीएस केल्याचा थेट पुरावाच सादर केला आहे. बँक संचालक सुरेंद्र उके यांनी त्यांच्या पत्नी सुप्रिया उके यांच्या नावे पैसे घेतले. तर 43 लाख रूपये हे बँक संचालकांकरवी सदावर्तेंनी थेट आपली पत्नी जयश्री पाटील यांच्या बँक खात्यावर आरटीजीस करून घेतल्याचा आरोपही संदीप शिंदे यांनी केला. तसंच, तक्रारदार शिवनाथ डोंगरे यांनी आपल्याला धमकावलं असल्याचा व्हिडीओच समोर आणला आहे.
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते आणि एसटी कामगारांच्या सहकारी बँकमधील प्रकरणाचा बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू आहे. याआधीही संदीप शिंदे यांनी सदावर्ते यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मागील वर्षी मार्च २०२४ मध्ये सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी यवतमाळमध्ये एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व सभासदांना अवहालाचं वाटप करण्यात आलं नव्हतं. अहवालावर नथुराम गोडसेचा फोटोही प्रिंट करण्यात आला होता, असा आरोप संदीप शिंदे यांनी केला होता. वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यापूर्वी सर्व सभासदांना 14 दिवस आधी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना देणं आवश्यक होतं, पण अशी कोणतीही सूचना संचालक मंडळाकडून मिळाली नाही. तसंच आपल्या मर्जीतील सभासद बोलवून हवं त्या विषयांना मंजुरी दिल्याची तक्रार संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे केली होती. या तक्रारीनंतर सदावर्ते दाम्पत्याचं संचालक पद रद्द करण्याचा निर्णयही सहकार खात्याने घेतला होता. याबद्दलही संदीप शिंदे यांनी याप्रकरणी सहकार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.