बीड प्रकरणात अखेर अजितदादा ऍक्टिव्ह, राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- “सर्व बाजूंनी टीका होऊ लागल्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बीड प्रकरणात ऍक्टिव्ह झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. राष्ट्रवादीचा अजित पवार गट आरोपाच्या पिंजऱ्यात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय खंडणीप्रकरणी अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराडवरही हत्येचा कट रचल्याचा आरोप करत मोक्का दाखल करण्यात आला आहे. हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेमुळे ही जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित अनेक लोकांचे नाव आले होते. यात राष्ट्रवादी काँग्रेसचा केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटेचा मुख्य आरोपींमध्ये समावेश आढळल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे.
दरम्यान, जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांची निवड होईपर्यंत राजेश्वर चव्हाण यांना जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच यापुढे तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या नेमणूक करताना त्यांच्या चारित्र्याची पडताळणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
चुकीची माणसं असतील तर बाजूला करावे लागते. आम्ही चौकशी करू. कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर दिले होते. वाल्मिक कराडशी जवळचे संबंध असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक महिना उलटून गेला आहे. या प्रकरणातला एक आरोपी अद्यापही फरार आहे, तसंच या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप ज्याच्यावर होतो आहे त्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे.
जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार. कुणाकडे काही पुरावे असतील त्यांनी आम्हाला द्यावे, त्यांच्यावर आम्ही कारवाई करु, असे अजित पवार म्हणाले होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….