शरद पवारांचा पक्ष सत्तेत जाणार? तरुणांसमोर स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘जे सोबत येतील त्यांना…’

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी युवकांच्या बैठकीमध्ये एक सूचक विधान केलं आहे. मागील काही दिवसांपासून शरद पवारांच्या खासदारांना ‘बाप आणि लेकीला सोडून दादांकडे या’ असा संदेश अजित पवारांच्या पक्षाकडून देण्यात आल्याची चर्चा आहे.
असं असतानाच शरद पवारांनी युवकांसमोर बोलताना पक्षाच्या भविष्यासंदर्भात भाष्य केलं आहे. शरद पवारांनी त्यांचा पक्ष सत्तेत जाणार असल्याच्या चर्चेवरही उत्तर दिलं. मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये शरद पवार बोलत होते. यावेळेस त्यांनी पक्षावर पुन्हा 1999 सारखी स्थिती निर्माण झाल्याचं म्हटलं आहे.
सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांचा पक्ष सत्तेत जाणार असल्याच्या बातम्या केवळ अफवाच आहेत, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. शरद पवारांनी तरुणांशी संवाद साधताना, “आपण जे सोबत येतील त्यांना घेऊन सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करु,” असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. पुढील 15 दिवसांमध्ये संघटनेत मोठे बदल आपल्याला पाहायला मिळतील, असं सूचक विधानही यावेळेस शरद पवारांनी केलं आहे. “1999 साली जी आपली परिस्थिती होती तीच आता निर्माण झाली आहे. आता माझ्याकडे देण्यासाठी काही नाही आणि गमावण्यासाठी देखील काही नाही,” असंही शरद पवारांनी तरुण सहकाऱ्यांना सांगितलं. त्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच सामोरे जाणार असल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
‘बापलेकीला सोडून अजित पवारांकडे या’
खासदार अमर काळे यांनी मोठा दावा केला आहे. सोनिया दुहान यांच्याकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 7 खासदारांना संपर्क साधण्यात आल्याचं ते म्हणाले आहेत. विरोधात बसून काय करणार आमच्यासोबत या असं सोनिया दुहान यांनी खासदारांना सांगितल्याचं अमर काळे म्हणाले आहेत. याची माहिती सुप्रिया सुळेंना दिल्याचंही अमर काळेंनी म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. आम्ही कधीही आमदार पळवले नाहीत, फोडले नाहीत असं ते म्हणाले आहेत.
“आमदार लोकशाहीच्या माध्यमातून अजित पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. आम्ही घेतलेल्या निर्णयावर महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेने विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून शिक्कामोर्तब केलं. माझ्या सार्वजनिक, राजकीय आयुष्यात बाप-लेक असा शब्दप्रयोग मी कधी केला नाही. पण अशी ओंगाळवाणा शब्दप्रयोग करण्याचा प्रयत्न काहीजण करत असतात. त्यांच्या तोंडून ती वाक्यं नेहमीच येत असतात,” असं तटकरे म्हणाले.