HMPVचा महाराष्ट्रात झाला शिरकाव ; नागपुरात २ मुलांना लागण, देशातील बाधितांची संख्या वाढली..!

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “सध्या चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमोव्हायरसने (एचएमपीव्ही) थैमान घातले आहे. महाराष्ट्राशेजारील दोन राज्यांत त्याचे तीन रुग्ण सापडले आहेत. त्याबद्दल समाज माध्यमांवरून व्हायरल होणाऱ्या पोस्टमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच आता महाराष्ट्रातही या HMPV व्हायरसचा शिरकाव झाला आहे.
नागपूर येथील दोन मुलांना याची लागण झाली आहे. या व्हायरसची लक्षणे आढळल्यानंतर या मुलांच्या केलेल्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलांमध्ये खोकला आणि तापासारखी लक्षणे दिसत होती. दोघांचाही HMPVचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ७ वर्षांचा मुलगा आणि १३ वर्षांच्या मुलीला HMPVची लागण झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही लहान मुलांना HMPVची लागण झाल्याचे निदान तीन जानेवारीला झाल्याचा दावा केला जात आहे. दोघांमध्येही सामान्य लक्षणे दिसत होती. कोणतीही गंभीर लक्षण नसल्यामुळे दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. योग्य औषधोपचारानंतर घरी पाठवण्यात आले. दोन्ही लहान मुले आजारातून बरे झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबईत एचएमपीव्ही बाधित रुग्ण आढळलेला नाही
मुंबई शहर आणि उपनगरात एचएमपीव्ही बाधित रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. तथापि, नागरिकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. मेटान्यूमोव्हायरसमुळे तीव्र श्वसन संसर्ग होतो. हा एक सामान्य विषाणू आहे. त्याचा संसर्ग श्वसनमार्गाला होऊन सर्दीसदृश आजार होतो. हा एक हंगामी रोग आहे. तो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या प्रारंभीला फैलावतो. या अनुषंगाने आरोग्य सेवा महासंचालनालय (डीजीएचएस) आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या (एनसीडीसी, दिल्ली) संचालकांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.
दरम्यान, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटकात या व्हायरसची लागण असलेले रुग्ण आढळून आल्यानंतर महाराष्ट्रातही याची लागण झाल्याचे समोर आल्याने देशातील HMPV बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात कुंभ मेळा होत असून, यावर HMPV व्हायरसचे सावट असल्याचे सांगितले जात आहे.